अन्न व औषध प्रशासनावर कामाचा अतिरीक्त भार

अपुऱ्या मनुष्यबळाचा बसतोय फटका

| पेण | वार्ताहर |

रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांसाठी अवघे सात अधिकारी अन्न व औषध प्रशासन विभागात कार्यरत आहेत. त्यांच्यावर कामाचा अतिरीक्त ताण येत आहे. तातडीने रिक्तपदे भरुन हा विभाग सक्षम करावा अशी मागणी जोर धरत आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल हा सर्वात मोठा तालुका आहे. अन्य व औषध प्रशासनाच्या आस्थापना एकट्या पनवेल तालुक्यात आहेत. त्यामुळे किमान पनवेल करिता तरी पूर्णवेळ अधिकारी असणे गरजेचे आहे. मात्र अपुऱ्या मनुष्यबळा अभावी 7 अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडताना दिसून येत आहे.15 तालुक्यात 7 अधिकारी कुठे फिरणार आणि कारवाई कशी करणार, असा प्रश्न आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्याला एकच क्लार्क आहे. नजीकच्या काळात अन्नातील भेसळ, मिठाईत भेसळ, बोगस औषधे तयार करणे, गुटख्याची विक्री आदी प्रकार वाढले आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचे काम अन्न व औषध प्रशासनाचे आहे मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे या अनधिकृत व्यवसायांवर शासनाचे हवे त्या पद्धतीने नियंत्रण नसल्याचे चित्र आहे.

2010 च्या तुलनेत रायगड जिल्ह्याची लोकसंख्या अमर्याद वाढली मात्र अन्न व औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून येते. सध्या जिल्ह्यात औषध विभागात 7 पदे मंजुर आहेत. त्यांपैकी 4 पदे भरलेली आहेत. तर 3 पदे रिक्त आहेत. अन्न विभागात 12 पदे मंजूर असताना केवळ 3 पदे भरलेली आहेत. रायगड जिल्ह्यात औषधांच्या तीन हजार आस्थापना आहेत. यामध्ये विक्री, उत्पादन, सौंदर्यप्रसाधनांसह आयुर्वेदिक उत्पादनांचा समावेश आहे. तर अन्नाशी संबंधीत सहा हजारांपेक्षा जास्त आस्थापना आहेत, अशा एकूण 9 हजार आस्थापनांसाठी 7 अधिकारी कसे पुरे पडणार.

रायगड जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनातील रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणार आहेत. त्यासंदर्भात जाहिरात देखील देण्यात आली आहे.

मारुती घोसाळवाड (सहाय्यक आयुक्त,अन्न व औषध प्रशासन, रायगड )
Exit mobile version