पाणीटंचाईवर मात करीत फुलविला मळा

परसबागेत भुवड दाम्पत्याकडून विविध भाज्यांचे उत्पादन
| तळा | वार्ताहर |
पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक शेतकर्‍यांनी भाजीपाला करणे सोडल्याचे आपण ऐकले असेल परंतु पाणी टंचाई असताना देखील योग्य नियोजनातून गणेशनगर येथील भुवड दाम्पत्याने आपल्या परसबागेत हिरवागार मला फुलवला आहे.गणेशनगर हे तालुक्यातील शेवटची सीमा असलेले गाव. उंच भागात वसलेल्या या गावात धरण, तलाव यांसारखे पाण्याचे स्त्रोत नसल्याने नेहमी पाण्याची वानवा असते. मात्र अशा परिस्थितीत देखील मनोहर भुवड व त्यांची पत्नी मनिता भुवड या दोघांनी मिळून आपल्या परसबागेत विविध प्रकारच्या भाज्यांचे उत्पादन घेतले आहे.मनोहर भुवड हे आपल्या शेतात भात पिकासह नाचणीचे पिकही गुरे पालन करून गावात दुग्धव्यवसाय सुद्धा करतात.

लहरी हवामानामुळे बर्‍याचदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने उदरनिर्वाह भागविण्यासाठी नाचणी व भात पिकासह ईतरही काही जोडधंदा असावा या हेतूने त्यांनी विविध भाज्यांचे पिक घेण्याचे ठरवले.व आपल्या परसबागेत वांगी,घेवडा,टोमॅटो, मिरची,दुधी भोपळा यांसारख्या अनेक भाज्यांची लागवड केली.गावातील नळाद्वारे हंड्याने पाणी भाजी पिकांना पाणी घालणे शक्य नसल्याने पाण्याची कमतरता भासू नये यासाठी परसबागेत पाण्याची टाकी ठेऊन त्यामध्ये पाणी साठवून भाजी पिकांना पाणी पुरवठा करू लागले.यामुळे पिकांना नियमित पाणी पुरवठा होऊ लागल्याने संपूर्ण परसबागेत विविध प्रकारच्या भाज्यांचा हिरवागार मळा फुलला.

पाणी टंचाई असताना देखील योग्य नियोजनातून विविध भाज्यांचे पिक घेता येऊ शकते आत्मविश्‍वास वाढल्यामुळे त्यांनी झेंडूची लागवड केली. व आपल्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर झेंडूच्या फुलांचे देखील मोठ्या प्रमाणावर पिक घेतले आहे.अपार कष्ट करण्याची क्षमता असेल तर मनुष्य कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय साध्य करू शकतो हे भुवड दाम्पत्याने दाखवून दिले असून पाणी टंचाईच्या समस्येमुळे शेतीकडे पाठ फिरविणार्‍या नागरिकांसाठी भुवड दांपत्याने आदर्श केला आहे.

Exit mobile version