पुण्यातील पाच पर्यटक थोडक्यात बचावले
| म्हसळा | प्रतिनिधी |
तालुक्यातील सकलप गावाजवळ ओव्हरलोड बॉक्ससाईड वाहतूक करणारा ट्रेलर मुख्य रस्त्यावर पलटी झाल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात पुण्यावरून श्रीवर्धनला फिरण्यासाठी आलेले चार पर्यटक आणि एक लहान मुलगी थोडक्यात बचावले. दरम्यान, ओव्हरलोड वाहतूक आणि कथित ‘हप्ता’प्रकरणामुळे प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
म्हसळा तालुक्यातील सकलप गावाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास बॉक्ससाईड वाहतूक करणारा ट्रेलर पलटी होऊन अपघात झाला. ट्रेलरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अपघाताच्या वेळी पुण्यावरून श्रीवर्धन येथे पर्यटनासाठी आलेले चार जण आणि एक लहान मुलगी रस्त्यावरून प्रवास करत होते. ट्रेलर पलटी झाल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिकांच्या मते, श्रीवर्धन तालुक्यातील कारीवणे आणि मेघरा परिसरात मोठ्या प्रमाणावर बॉक्ससाईड उत्खनन सुरू आहे. काही राजकीय आश्रयामुळे हा व्यवसाय वाढल्याचा आरोप करण्यात येत आहे. मायनिंग साईटवरून डम्पर आणि ट्रेलरमध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट बॉक्ससाईड भरून वाहतूक केली जात असल्याचेही समोर आले आहे.
या ओव्हरलोड वाहतुकीमुळे सकलप परिसरात वारंवार अपघात होत असून, काहींना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तरीदेखील या प्रकारावर नियंत्रण येत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दरम्यान, या प्रकरणाला आणखी गंभीर वळण देत मनसेचे माजी तालुका अध्यक्ष सौरभ गोरेगावकर यांनी मोठा आरोप केला आहे. त्यांच्या मते, ओव्हरलोड वाहतूक सुरू ठेवण्यासाठी संबंधितांकडून प्रत्येक ट्रेलर व डम्परमागे सुमारे पाच हजार रुपयांचा ‘हप्ता’ आरटीओपर्यंत पोहोचवला जातो. या कथित व्यवहारामध्ये काही स्थानिक राजकीय व्यक्तींचा सहभाग असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या घटनेनंतर बेकायदेशीर उत्खनन, ओव्हरलोड वाहतूक आणि प्रशासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
