। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागा अंतर्गत गुरुवारी अर्थशास्त्राचे जनक अॅडम स्मिथ यांचा स्मरण दिन साजरा करण्यात आला. 17 जुलै 1790 रोजी अॅडम स्मिथ यांचा मृत्यू झाला. या दिनाचे औचित्य साधून अर्थशास्त्र विभागांतर्गत विद्यार्थ्यांना अॅडम स्मिथ यांचे अर्थशास्त्रातील योगदान आणि त्यांचे चरित्र उलगडून दाखविण्यासाठी अर्थशास्त्र विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे यांनी आपल्या प्रस्तावनेत अॅडम स्मिथ यांचे अर्थशास्त्रातील योगदान स्पष्ट केले तर या विभागातील विद्यार्थी श्रेया शेळके, श्रुती घरत, जयेश पाटील यांनी अॅडम स्मिथ यांचे बालपण, शिक्षण आणि ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ हे अॅडम स्मिथ यांच्या गाजलेल्या पुस्तकावर प्रकाश टाकला. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यांमधील परस्पर संबंध स्पष्ट केला तर कला विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील यांनी दैनंदिन जीवनातील अर्थशास्त्र आणि नैतिकता यावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सदर कार्यक्रमासाठी वृषाली घरत आणि विद्यार्थी वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. रसिका म्हात्रे यांनी केले.