पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर, तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना अद्याप एकही छदाम नाही

श्रीवर्धन | संतोष चौकर |

राज्यात कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी व महापुरामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती हानी झाली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये महापूर येऊन खूप मोठ्या प्रमाणावरती जीवित व वित्तहानी झाली आहे. शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे नापीक झाली असून दूध देणाऱ्या पाळीव प्राण्यांचे देखील मोठ्या प्रमाणावर जीव गेले आहेत. रायगड जिल्ह्यात त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात दरडी कोसळून अनेक जणांचे जीव गेले आहेत. महाड तालुक्यातील तळीये गावामध्ये दरडीखाली 80 च्या वरती लोक गाडले गेले होते.

त्यापैकी काही मृतदेह काढण्यात एन.डी.आर.एफ.च्या टीमला यश आले. तर बाकीचे मृतदेह न काढता सर्वांना मृत म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुरग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली व त्यानंतर त्यांनी आज अकरा हजार पाचशे कोटी रुपयांचे  पॅकेज जाहीर केले आहे. पूरग्रस्तांची खरोखरच परिस्थिती पाहता हे पॅकेज तातडीने जाहीर होणे गरजेचे होते. परंतु तोक्ते चक्रीवादळा मध्ये देखील कोकणात मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले. यावेळी रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. श्रीवर्धनच्या आमदार व रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, त्याच प्रमाणे आमदार अनिकेत तटकरे व राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी श्रीवर्धन येथे बैठक घेऊन प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

पंचनामे झाल्यानंतर लवकरच मदत दिली जाईल असे आश्वासन देखील दिले होते. परंतु वादळ होऊन तीन महिने होण्यास आले तरी अद्याप कोणत्याही वादळग्रस्ताला एकही छदाम मिळालेला नसल्याची बाब समोर आली आहे. तरी  पूरग्रस्तांना मदत देत असताना वादळग्रस्त शेतकरी व नागरिकांना देखील शासनाने तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Exit mobile version