रोहा तालुक्यात भातलागवडीची लगबग

। चणेरा । प्रतिनिधी ।

दमदार पावसाच्या आगमनाने रोहा तालुक्यातील भातलागवडीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. तालुक्यातील कोलाड, खांब, धाटाव, गोफण, चणेरा, कोकबन, घोसाळे, उडदवणे, वरसे, देवकान्हे आदी गावांतील शिवार सध्या शेतकऱ्यांच्या उत्साहाने गजबजून गेले आहेत. काळ्या मातीत राबणारे शेतकरी, महिलांच्या ओठांवर झुलणारी पारंपरिक लावणीची गाणी, सामूहिक श्रमदान आणि शेतातच होणारे सामूहिक जेवण यामुळे ग्रामीण संस्कृतीचे जिवंत आणि मनमोहक दर्शन घडत आहे.

पावसाने अनुकूल साथ दिल्याने शेतकऱ्यांनी भातलागवडीची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. यंत्रांच्या युगातही अनेक गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने भातलागवड करण्याची परंपरा आजही कायम आहे. गावागावांत श्रमदानाच्या माध्यमातून एकमेकांच्या शेतात मदतीचा हात दिला जात आहे. त्यामुळे केवळ शेतीचे कामच वेगाने होत नाही, तर गावातील सामाजिक ऐक्यही अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

याच पार्श्वभूमीवर वरसे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा प्रगतशील शेतकरी अमित मोहिते यांनी स्वतः शेतात उतरून भातलागवडीत सहभाग घेतला. सुमारे सहा ते सात एकर क्षेत्रात त्यांनी पारंपरिक पद्धतीने ‘जया’ या भात वाणाची लागवड केली. राजकीय आणि सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळतानाही शेतीशी असलेली आपली नाळ त्यांनी कायम जपली असल्याचे यावेळी दिसून आले.

यावेळी बोलताना अमित मोहिते म्हणाले, “शेती हा आमचा केवळ व्यवसाय नसून संस्कार आहे. समाजाचे पोट भरणाऱ्या या मातीत राबण्यातच खरा अभिमान आहे. आम्ही अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शेती करत आलो असून, यंदाही ‘जया’ या भात वाणाची लागवड केली आहे.” ते पुढे म्हणाले, “आमच्या वाडीतील सुमारे ४० मजूर आणि ग्रामस्थ गेल्या ४० वर्षांपासून एकत्र येऊन भातलागवडीची परंपरा जपत आहेत. एकमेकांच्या शेतात श्रमदान करण्याची संस्कृती आजही कायम असल्यामुळे बाहेरून मजूर आणण्याची गरज भासत नाही. हीच गावाच्या एकोप्याची आणि ग्रामीण संस्कृतीची खरी ताकद आहे.”

लावणीदरम्यान महिलांनी पारंपरिक लावणीची गाणी गात संपूर्ण शिवारात उत्साहाचे वातावरण निर्माण केले. दुपारच्या वेळी शेतातच सामूहिक जेवणाचा कार्यक्रम पार पडला. श्रम, सहकार्य आणि संस्कृतीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने हा सोहळा केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता ग्रामीण जीवनातील सामाजिक ऐक्याचे प्रतीक ठरला.

आधुनिकतेच्या वाढत्या प्रभावातही रोहा तालुक्यातील अनेक गावांमध्ये जपली जात असलेली भातलागवडीची ही पारंपरिक पद्धत आणि सामूहिक श्रमसंस्कृती नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, ग्रामीण महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवत आहे.

Exit mobile version