मुरुड तालुक्यात भात लावणी अंतिम टप्प्यात

। आगरदांडा । वार्ताहर ।

मुरुड तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भात लावणी अंतिम टप्प्यात आली असून दमदार पावसामुळे खारपट्टयातील तसेच सखल भागातील शेती लावण्यात बळीराजा व्यस्त आहे.

सलग महिना भर पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात लावणीच्या कामात मोठा व्यत्यय येत असला तरी खरीप हंगामातील भात हे एकमेव पीक असल्यामुळे लावणीसाठी पटेल वा रोजंदारीवर महिला शेतात राबताना दिसत आहेत. आतापर्यंत 2287 मि.मी. पावसाची नोंद झाल्याने नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यात भात लागवड क्षेत्र 3300 हेक्टर असून अत्यल्प भू धारकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. भाताचे विविध वाणांमध्ये सुवर्णा, जया, वाडा कोलम, रूपाली, चिंटू, श्री, शुभांगी, सारथी, कोमल, जोरदार आदी प्रकार उपलब्ध असले तरी येथील शेतकरी वर्ग बहुधा सुवर्णा, जया, वाडा कोलम, चिंटू या वाणांना अधिक प्राधान्य देतात, असे चित्र आहे. पारंपारिक पद्धतीने अर्थात बैल जोड घेऊन चिखलणी, नांगरणी करून भात लागवड केली जाते. नांगऱ्यांना 1 हजार रुपये तर पुरुषांना 500 तर महिलांना 300 ते 400 रुपये मजुरी द्यावे लागते.

कृषी कार्यालयाकडून ग्रामपंचायत निहाय भात लागवडीच्या सगुणा राईस टेकनिक (SIT) व चारसुत्री भात लागवडीचे प्रयोग प्रात्यक्षिका द्वारे केले जातात. सगुणा पद्धतीत नांगरणीचा खर्च वाचत असल्याने शेतकऱ्यांकडून या पद्धतीला अधिक पसंती मिळत आहे. मात्र अशा सुधारीत लागवडीचे क्षेत्र 5 ते 10 हेक्टर इतके नगण्य आहे. यांत्रिक पद्धतीने भात लागवडीसाठी शेतकरी पुढे का येत नाहीत या संदर्भात तालुका कृषी अधिकारी मनिषा भुजबळ यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, यांत्रिकीकरणाने भात लागवड करण्यासाठी 20-21 दिवस यंत्रधारकांना पूर्व कल्पना द्यावी लागते. म्हणजे त्याप्रमाणात ते रोपांचे ट्रे तयार करतात. एकरी किमान 80 ट्रे लागतात. ट्रेसाठी माती चाळणे, मातीत शेणखत मिसळणे इ. तयारी आधीच करावी लागते. तालुक्यामध्ये यंत्र उपलब्ध नसल्याने जास्त शेतकऱ्यांना या विषयी माहिती नाही. परंतु यावर्षी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक बघितल्याने चोरढे पंचायत हद्दीतील बऱ्याच शेतकऱ्यांनी पुढील वर्षी यंत्राने लागवड करण्याचे ठरवले आहे. तसेच इतर ठिकाणीही पुढील वर्षी प्रात्यक्षिके घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तालुका कृषी कार्यालयाकडुन प्रधान मंत्री पीक विम्याविषयी गावोगावी जनजागृती करण्यात येत असून ग्रामपंचायत पातळीवर शेतकऱ्याना पीक विमा अवघा एक रुपयात काढा, असे आवाहन करण्यात येत आहे. ३१ जुलै अखेर मुदत ही वाढवून दिली होती. काही ठिकाणी सीएससीवर नोंदणी सुरु असली तरी म्हणावा तसा प्रतिसाद दिसून येत असल्याची स्थिती आहे. पिक विमा प्राप्त होण्यासाठी निकषाप्रमाणे भात पिकाची आणेवारी ५१ टक्के पेक्षा कमी असावी लागते. परंतु कोकणात ही टक्केवारी ६० ते ७० टक्के पेक्षा अधिक भरते. पर्यायाने पीक विम्याची रक्कम दिली जात नाही ही मोठी अडचण ठरते. त्यामुळे पीक विम्याकडे तितक्या गांभीर्याने पहिले जात नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. मात्र कृषीविभागाकडून शेतीतील राबांचे तसेच पाणी साचून कुजलेल्या भाताच्या लागवडीच्या नुकसानीची माहिती घेतली जात आहे. येत्या २/४ दिवसात पांथळ जमिनीवर भाताची लागवड अंतिम टप्प्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाने दिली असून यंदा पावसाचे प्रमाण अतिशय चांगले असल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदित झाला आहे.

Exit mobile version