संरक्षक कठडे तुटून सळ्या बाहेर, दुर्घटना होण्याची भीती
| पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत हद्दीतील पडसरे गावाकडे जाणारा ओढया वरील पूल अत्यंत जीर्ण व धोकादायक बनला आहे. त्यामुळे सदरचा पूल कोसळून मोठी दुर्घटना होण्याची दाट भीती निर्माण झालीय. विशेष म्हणजे वाहतुक, प्रवास व रहदारीसाठी एकमेव पूल आहे.
पडसरे आदिवासी आश्रमशाळा या ठिकाणी असून साधारणत 500 च्या आसपास विद्यार्थी येथील शिक्षण घेण्यासाठी दुर्गम भागातील आदिवासी वाड्यापाड्यातून येत असतात. मुलांच्या जेवणाची व्यवस्था या शाळेत होत असल्याने यासाठी लागणारे रेशन साहित्याची याच पुलावरून वाहतूक होत असते. त्यामुळे हा पूल अत्यंत महत्वाचा आहे. शिवाय या पुलावरून महागाव, कवेळे, हातोंड, चंदरगाव, ताडगाव, लोळगे वाडी, एकलघर, शिरसे वाडी, चरफळवाडी आदींसह गावे व कातकरवाडी येथील नागरिकांची, विद्यार्थ्यांची याच पुलावरून येजा सुरू असते.
तसेच निसर्गाच्या कुशीत असलेला पडसरे धबधबा हा पर्यटकांसाठी आकर्षण ठरतोय. रायगड सह मुंबई पुणे व अन्य भागातील पर्यटक नागरिक याच पुलाच्या रस्त्यालगत असलेल्या धबधब्याच्या मनमुराद आनंद लुटण्यासाठी येत असतात. या पुलावर सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. मात्र आजघडीला हा पूल शेवटची घटका मोजतोय. पुलाचे संरक्षण कठडे तुटले आहेत. सळ्या बाहेर निघाल्या आहेत. पुलाची खालील बाजू व खांब मोडकळीस आलेत, ते केव्हाही तुटू शकतात व पूल कोसळू शकतो, अशी चिंताजनक परिस्थिती आहे. एकावेळी अरुंद असलेल्या पुलावरून दोन वाहने पूल ओलांडताना सळ्यानी अपघात होण्याची तसेच वाहन पुलाखाली कोसळण्याची दाट शक्यता आहे. एखादी जीवघेणी दुर्घटना घडण्यापूर्वी पडसरे पुलाचे नव्याने मजबूत व दर्जेदार बांधकाम करण्यात यावे, व नागरिक, पर्यटक व विद्यार्थी, रुग्णांचा प्रवास सुखकर व्हावा अशी मागणी केली जात आहे.
पडसरे पूल अखरेची घटका मोजतोय, पूल चहू बाजूनी मोडकळीस आला आहे. येथील आदिवासी आश्रम शाळेला दैनंदिन भोजनाचे साहित्य देण्यासाठी या पुलावरून दररोज वाहन न्यावे लागते. या पुलावर आलो की उरात धडकी भरते, पूल कधीही कोसळेल अशी पुलाची दुरावस्था झालीय. प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन पूल सुस्थितीत आणावा.
सत्यवान दत्ताराम शिंदे,
वाहनचालक