| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली शहरातील अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. हटाळेश्वर चौक, गांधी चौक, पाली बस स्थानक परिसरात बेकायदेशीर पार्किंग, फूटपाथवरील गाळे, रस्त्यांवरील अडथळे यामुळे वाहन चालकांना आणि पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बाजारपेठ असल्यामुळे या भागात नेहमीच रहदारी असते; परंतु, नियोजनाचा अभाव आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे.
पाली संघर्ष समितीने या समस्येकडे वारंवार लक्ष वेधले आहे. तक्रारी, निवेदनं, आंदोलनं करूनही नगरपंचायतीकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. शहराचा रस्ता हा सर्वांचा आहे, तो कोणाच्या खासगी मालकीचा नाही, असा सूर आता जनतेतून उमटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पराग मेहता यांच्याकडून ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी शहराच्या समस्यांकडे जातीने लक्ष देण्याचे संकेत दिले आहेत. अतिक्रमण हटवणे, वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करणे आणि बाजारपेठ परिसरात नागरिकांना सुलभ व सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळावा, यासाठी त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
पाली शहरला अतिक्रमणाचे ग्रहण
