| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
पाली शहरातील हटाळेश्वर चौक ते गांधी चौक हा मुख्य मार्ग नगरपंचायतीने पार्किंगसाठी अधिकृतपणे खुला केला आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे याठिकाणी वाहने लावू नये, असे फलक लावण्यात आले असताना देखील वाहने अवैधरित्या लावली जात आहेत. या वाहनचालकांना पोलीस प्रशासनाची भितीच राहिली नसल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. तसेच, बाजारपेठेत दररोज हजारो नागरिक खरेदीसाठी येत असताना आयडीसी बँकेसमोर, हटाळेश्वर चौकात आणि एकता पथ खालच्या मोहोल्याकडे जाणाऱ्या अरुंद रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांची सर्रास पार्किंग होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी, अर्ज आणि निवेदन देऊनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. या संदर्भात ॲड. नोएल चिंचोलकर आणि अन्वर परबलकर यांनी स्पष्ट इशारा दिला की, आगामी पंधरा दिवसांत जर या मार्गावरील अवैध पार्किंगवर कारवाई झाली नाही तर एकतापथ व खालच्या मोहोल्यातील नागरिक पाली नगरपंचायतसमोर उपोषणाला बसावे लागेल. दरम्यान, या भागातील नागरिकांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा विनंती केली आहे की, वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र जागा निश्चित करावी आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलीस व नगरपंचायत संयुक्तपणे पावले उचलावीत.







