प्रदूषणामुळे नागरिक व गुरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
। सुधागड-पाली । प्रतिनिधी ।
पाली येथील टेंबी व शिक्षक वसाहती जवळ असलेल्या डम्पिंग ग्राउंड ची प्रचंड दुरावस्था झाली आहे. प्रदूषणामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, गुरांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
संरक्षक भिंत नसल्याने डम्पिंग ग्राउंड मधील कचरा मोठ्या प्रमाणावर अस्ताव्यस्त झाला आहे. रस्त्यावर देखील आला आहे. तसेच या कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी हा कचरा जाळला जातो. परिणामी मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. ओला व सुका कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याच शास्त्रीय पद्धतीचा वापर होतांना दिसत नाही. किंवा कचर्यावर विलगीकरणाची प्रक्रिया देखील केली जात नाही. परिणामी घंटा गाडी अथवा कचारा गाडीतुन डंपिग ग्राऊंड मध्ये ओला-सुका कचरा एकत्रितरित्या गोळा करुन टाकला जातो आणि तेथेच तो जाळला जातो. परिणामी सुका कचरा अनेक दिवस तशाच जळत राहतो. त्यामूळे मोठ्या प्रमाणात विषारी धुर निर्माण होऊन वायु प्रदुषण होते. तसेच ओला कचरा न जळाल्याने तो तेथेच सडत राहतो त्यामुळे आजुबाजूच्या परिसरात प्रचंड दुर्गंध पसरते. या दुर्गंधी बरोबरच रोगराईचा प्रसार होतो. पावसाळ्यात हे दूषित पाणी मानवी वस्तीत शिरते. या डम्पिंग ग्राऊंड जवळ शिक्षक वसाहत आणि इतर वसाहती आहेत. शिवाय मढाळी व शिळोशी गावाकडे जाणारा रस्ता आहे. परिणामी येथील रहिवासी व तेथुन येणार्या जाणार्या पादचार्यांना व चालकांना याचा त्रास होतो.
जनावरांचे आरोग्यही धोक्यात
गाय, बैल, म्हशी, कुत्रे तसेच कावळे हे पशुपक्षी डम्पिंग ग्राऊंडमध्ये खाण्याचे काही मिळते का यासाठी फिरत असतात. आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये टाकलेले अन्न पदार्थ तसेच पिशवी सकट खातात त्यामुळे त्यांचेही आरोग्य धोक्यात येत आहे. येथील प्लास्टिक खाऊन कित्येक गुरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
डम्पिंग ग्राऊंड आद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यामध्ये कंपोस्ट पिट्स (खत खड्डे) आणि एम.आर.एफ. शेडचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. कंपोस्ट खत खड्ड्यांचे काम पूर्ण होताच ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मितीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. एम.आर.एफ. शेडमध्ये सुक्या कचऱ्याचे विलगीकरण केले जाईल, तसेच प्लास्टिक बेलिंग मशीनचा वापर करून प्लास्टिक कचऱ्याचे कॉम्प्रेस्ड बेल्स (गठ्ठे) तयार केले जातील. सुरक्षा भिंतीच्या (कंपाउंड) बांधकामासाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
-माधुरी मडके,
मुख्याधिकारी, नगरपंचायत, पाली
या डम्पिंग ग्राउंडच्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे दुर्लक्ष आहे. नगरपंचायतने डम्पिंग ग्राउंड बंदिस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गुरांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहे. एकीकडे क्रीडा मैदानाला कोट्यावधीचा निधी आणि दुसरीकडे नागरिकांच्या व गुरांच्या आरोग्याकडे स्पष्टपणे दुर्लक्ष होत आहे. नगरपंचायत प्रशासन डम्पिंग ग्राउंड मध्ये लाखोंची कचरा विल्हेवाट लावण्याची यंत्रणा धुळखात ठेवून कचरा बेकायदेशीरपणे जाळून प्रदूषण करीत आहेत.
-कपिल पाटील,
सामाजिक कार्यकर्ते, पाली
