शासकीय पोर्टलवर तालुका म्हणून पालीचा उल्लेख

प्रशासकीय निष्काळजीपणाविरोधात तीव्र असंतोष

| पाली | प्रतिनिधी |

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमिकरण अभियान’ या उपक्रमांतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी सध्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. मात्र, महाआयटीच्या अधिकृत पोर्टलवर अर्ज करताना रायगड जिल्हा निवडल्यानंतर तालुक्याच्या यादीत सुधागड ऐवजी पाली असा पर्याय दाखवला जात आहे. शासनाच्या या अक्षम्य चुकीमुळे संपूर्ण सुधागड तालुक्यात तीव्र असंतोष पसरला असून, तालुक्याच्या ऐतिहासिक अस्मितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पाली हे सुधागड तालुक्याचे मुख्य प्रशासकीय आणि मुख्यालय असले, तरी तालुक्याचे अधिकृत नाव सुधागड असेच आहे. यापूर्वीही जिल्हा प्रशासनाकडून निघणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन किंवा इतर शासकीय परिपत्रकांमध्ये वारंवार सुधागड ऐवजी पाली असा चुकीचा उल्लेख करण्यात आला होता. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी वेळोवेळी लक्ष वेधूनही ही चूक सुधारण्याऐवजी आता थेट शासनाच्या अधिकृत ऑनलाईन पोर्टलवरच पाली असा तालुक्याचा उल्लेख केल्याने स्थानिक नागरिक व दुर्गप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासन आणि संबंधित महाआयटी विभागाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन पोर्टलवरील ही चूक सुधारावी. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयातून होणाऱ्या सर्व शासकीय पत्रव्यवहारात सुधागड तालुक्याचाच योग्य आणि अधिकृत उल्लेख केला जावा, अशी आक्रमक मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे भविष्यात सुधागडचे ऐतिहासिक नाव प्रशासकीय दप्तरावरून पुसले तर जाणार नाही ना, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून होणाऱ्या अनेक पत्रव्यवहारांमध्ये सुधागड ऐवजी पाली असा तालुक्याचा उल्लेख केला जातो. पाली हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे; मात्र, तालुका सुधागड आहे. याचा विसर प्रशासनाला वारंवार पडत आहे. लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला याची जाणीव करून दिली, तरीही ही चूक सुधारली गेली नाही. उलट आता थेट महिला शेतकरी पोर्टलवरच तालुक्याच्या जागी पाली नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्याचे ऐतिहासिक नाव पुसून टाकण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, असा प्रश्न पडतो.

निलेश शिर्के,
सामाजिक कार्यकर्ते, सुधागड
Exit mobile version