| उरण | प्रतिनिधी |
निवासी वापरासाठी मंजूर असलेल्या जागेचा नियमबाह्य व्यावसायिक वापर करणाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या दि.22 सप्टेंबर रोजीच्या आदेशाने धोक्याची घंटा वाजली आहे. निवासी वापरासाठी निश्चित केलेल्या जागेचा परवानगीशिवाय व्यावसायिक वापर होत असल्यास संबंधित प्राधिकरणाने कायद्यानुसार कारवाई करावी, तसेच कारवाई करताना ‘पिक अँड चूज’ म्हणजे निवडक पद्धतीचा अवलंब करू नये, अशी भूमिका न्यायालयाने स्पष्ट केली आहे. या पार्श्वभूमीवर उरण शहरातील निवासी सदनिकांमध्ये सुरू असलेल्या कथित व्यावसायिक वापराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
उरणमध्ये काही निवासी सदनिकांचा वापर दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, दुकाने, ब्युटी पार्लर आणि अन्य व्यावसायिक कारणांसाठी खुलेआम सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. निवासी वापरासाठी मंजूर असलेल्या सदनिकांमध्ये व्यावसायिक आस्थापना सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत का? संबंधित वापर मंजूर बांधकाम आराखड्याशी सुसंगत आहे का? याची तपासणी करण्याची गरज असताना पालिका प्रशासन मात्र याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप होत आहे. या कथित प्रकाराबाबत यापूर्वी वृत्त प्रसिद्ध झाले असून, पालिका प्रशासनाकडे लेखी तक्रारीही करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी अथवा प्राथमिक चौकशी झालेली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेबाबत उरणकरांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







