‘मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात पाली दुमदुमली

दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदा तेजीत

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी प्रख्यात धार्मिक स्थळ असलेल्या पाली बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी संकष्टी चतुर्थीला पालीत भाविकांची अलोट गर्दी उसळल्याचे पहावयास मिळाले. सकाळपासून पाली प्रवेशद्वारापासून पाली मंदिर परिसर भाविक भक्तगणांनी अक्षरशः गजबजून गेला. गर्दीचे नियोजन व्हावे यासाठी रेलिंगच्या माध्यमातून रांगेत दर्शन घेण्याची व्यवस्था केल्याने सर्वाना दर्शन घेता आले. बाप्पाच्या चरणी गणेशभक्त नतमस्तक होऊन धन्य झालेले पहावयास मिळाले. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या गजराने पाली नगरी दुमदुमली.


बल्लाळेश्‍वराच्या दर्शनासाठी नेहमीच राज्य व देशातून भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थीत राहतात. अशातच दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या उत्तम सोयी-सुविधेसाठी बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्ट व प्रशासन नेहमीच दक्ष व सज्ज असते. काही महिन्यांपासून दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. सलग लागून आलेल्या सुट्टीतदेखील भाविक मंदिरात मोठी गर्दी करीत आहेत. अरुंद रस्ते, खासगी, सार्वजनिक वाहनांच्या वाढत्या संख्येने पालीत अनेकदा वाहतूक कोंडी झाल्याची परिस्थिती दिसून आली. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पालीत वाहतूक पोलीस ठिकठिकाणी तैनात होते. सकाळपासूनच दर्शनासाठी लहान थोर, तरुण, महिला वृद्ध यांच्या रांगा लागल्या होत्या. गर्दी असल्याने येथील दुकानदार व हॉटेल व्यवसायिकांचा धंदादेखील तेजीत होता. बल्लाळेश्‍वर मंदिर परिसरात गावठी भाज्या, फळे, कंदमुळे व रानमेवा घेऊन अनेक महिला विक्रेत्या बसल्या होत्या. देवळात येणारे भाविक आवर्जून ते खरेदी करत होते. त्यामुळे या विक्रेत्यांचा धंदा चांगला झाला.

वाहतूक कोंडी
पालीत दाखल झालेल्या भाविकांच्या गाड्यांमूळे वाहतुक कोंडी झाली होती. परंतू पाली पोलीस व बल्लाळेश्‍वर देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करत होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यादृष्टीने पाली पोलीस निरीक्षक विश्‍वजीत काइंगड़े यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक नाक्यावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देवळाच्या शेजारून जाणारी सर्व वाहने भक्तनिवास क्रमांक 1 च्या बाजूने वळविण्यात आली होती.

बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने येत आहेत. खूप दिवसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक पहायला मिळाले. पर्यटकदेखील मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे व्यवसायदेखील चांगला झाला. लहान मोठ्या व्यवसायिकांना रोजगार निर्माण झाला.

मुकुंद धारप
व्यावसायिक, बल्लाळेश्‍वर मंदिर

बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. रांगेत उभे राहण्यासाठी रेलींग व शेड उभारण्यात आली आहे. वाहने पार्क करण्यासाठी देवस्थानची दोन भव्य मोफत पार्किंग देखील आहे. तसेच सुसज्ज स्वच्छता गृहदेखिल उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होत नाही.

जितेंद्र गद्रे
अध्यक्ष, बल्लाळेश्‍वर देवस्थान ट्रस्ट पाली
Exit mobile version