वाहनचालकांची वाहन चालवताना कसरत
| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली-खोपोली मार्गावर रासळ येथे सद्यःस्थितीत मोठ्या प्रमाणात मोकाट गुरांचा सुळसुळाट असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जणु काही या गुरांनी रस्त्यावर रास्ता रोको केल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. सद्यःस्थितीत पाली खोपोली हा महामार्ग चांगल्या स्थितीत असल्यामुळे या मार्गावर वाहनांची वर्दळ पाहायला मिळत आहे. अशातच या मार्गावर वाढत्या मोकाट गुरांच्या संख्येमुळे वाहनचालकांना वाहन चालवतांना अक्षरश: तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या मोकाट गुरांच्या दिवसेंदिवस वाढत्या संख्येमुळे या गुरांना कोणी वाली आहे की नाही? ही गुरे रस्त्यावरती अशीच मोकाट सोडुन देण्यात आली आहेत की काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या मोकाट गुरांचे कळपच्या कळप रस्त्याच्या मध्येच उभे व ठाण मांडून बसलेले असतात. यांच्यामागे कोणीच गुराखी वगैरे दिसून येत नाही. तसेच वाहनचालकांना जाण्यासाठी रस्ताच मोकळा नसल्यामुळे गाडीचा हॉर्न वाजवूनसुद्धा गुरे बाजूला होत नाहीत. शेवटी वाहनचालकांना गाडी उभी करुन गाडीतून उतरुन गुरांना बाजूला करावे लागत आहेत.
या मोकाट गुरांच्या रस्त्याच्या मध्येच बरेच वेळा झुंज होत असतात. या झुंजीमुळे गाड्यांना अपघात होऊन गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत. जर का यामध्ये वाहनचालकांची चुकी नसताना एखाद्या गुराला जर धडक बसून अपघात झाला की लगेचच मोकाट सोडणार्या गुरांचे मालक त्याठिकाणी नुकसानभरपाईचा दावा करण्यासाठी पुढे सरसावत असतात. त्यामुळे पाली-खोपोली महामार्गावर मोठ्या प्रमाणात फिरणार्या मोकाट गुरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.