। अलिबाग । प्रतिनिधी ।
ढवर येथील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते, सामाजिक कार्यात नेहमी सक्रिय सहभाग घेणारे हरहुन्नरी, मनमिळाऊ, सर्व क्षेत्रात हिरिरीने सहभाग घेणारे रघुनाथ विष्णू पाटील यांचे सर्पदंशाने शनिवारी (दि. 21) निधन झाले. निधनसमयी ते 59 वर्षांचे होते. त्यांच्यावर ढवर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
रायगड जिल्ह्याला कबड्डीची पंढरी समजले जाते. त्या रायगड जिल्ह्याच्या संघाचे प्रतिनिधित्व केलेले रघुनाथ पाटील हे नूतन हनुमान क्रीडा मंडळ ढवर या संघाचेसुद्धा अध्यक्ष होते. त्यांनी अनेक क्रीडांगणे गाजवून मंडळाला अनेक बक्षिसे मिळवून दिली. कबड्डी खेळासोबत ते बैलगाडीप्रेमी, भजनप्रेमी होते.
रघुनाथ पाटील यांच्या निधनाने गावातील एक हरहुन्नरी व्यक्ती गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रघुनाथ पाटील यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात एक भाऊ, बहिणी, पत्नी, एक मुलगा शुभम पाटील, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा पाटील परिवार आहे. त्यांचे दशविधी कार्य (दहावे) सोमवार, दि. 30 सप्टेंबर रोजी सकाळी ठीक 8 वाजता ढवर येथे होणार आहेत. रघुनाथ पाटील यांच्या अंत्यविधीप्रसंगी पाटील कुटुंबिय, ग्रामस्थ, नातेवाईक, राजकीय पुढारी, बैलगाडीप्रेमी, भजनप्रेमी आदी सर्व क्षेत्रातील मान्यवर हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.