न्हावा-शेवा पोलिसांचा कार्यक्रम; 800 विद्यार्थ्यांचा सहभाग
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण, बदलापुरातील संतापजनक घटनेनंतर अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून शाळेच्या विद्यार्थ्यांमध्येही लैंगिक अत्याचारापासून संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्यावतीने शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बदलापूर येथील घटनेनंतर न्हावा-शेवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान व चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी जेएनपीएच्या कामगार वसाहतील मल्टीपर्पज हॉलमध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये आरकेएफ स्कूलचा शिक्षकवर्ग व पाचवी ते दहावीचे सुमारे 800 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात लैंगिक अत्याचारापासून संरक्षण याबाबत पेण येथील चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया येथील एनजीओचे डॉ. किशोर देशमुख, अॅड. शैलेश कोंडुसकर, अॅड. विवेक गोपी यांनी चिल्ड्रन्स अवेअरनेसबाबत विद्यार्थी व विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले, तसेच उपनिरीक्षक लेंडे, महिला पोलीस हवालदार नाईक यांनी सायबर गुन्हे, डायल 112, निर्भया पथक महिला सहाय्य कक्ष व महिलांच्या सुरक्षासंदर्भात माहिती दिली.