राष्ट्रीय ग्रामस्वराज कार्यक्रमांतर्गत अभियान
| म्हसळा | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषद अलिबाग व पंचायत समिती म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक वाचनालय म्हसळा सभागृह येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान कार्यक्रम अंतर्गत संकल्प आधारित विकास आराखडा तयार करणेसंदर्भात तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, प्रशासक यांचेसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
ग्रामपंचायत हद्दीतील गाव खेड्यांमध्ये विकास कामांचे आराखडे तयार करताना ग्रामसभांमध्ये लोकसहभाग महत्वाचा असतो. गावात पायाभूत सुविधांची निर्मिती करताना स्वच्छता, पाणी पुरवठा, शिक्षण, आरोग्य, कृषी या सर्व घटकांचा विचार करून दुर्बल व वंचित घटकांना प्राधान्यक्रम देणे महत्वाचे असते. त्याचबरोबर गरिबी मुक्त आणि उपजीविका वृद्धीस गाव, आरोग्यदायी गाव, बाळस्नेही गाव, जल समृद्ध गाव, स्वच्छ व हरित गाव, पायाभूत सुविधा असलेले स्वयंपूर्ण गाव, सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव, लिंग समभाव पोषक गाव अशा एकूण नऊ थीमचा (गोल) वापर करून गावांचा शाश्वत विकास आराखडा तयार करण्याचे कामी आशासेविका, आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, अंगणवाडी सेविका, शेतकरी व शेती संबंधित घटक, साक्षरता कर्मचारी आणि शिक्षक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नोती अभियान समूह संसाधन व्यक्ती, बँकर्स, शासकीय विभाग आणि यंत्रणा, ग्रामरोजगार सेवक, सामाजिक कार्यकर्ते, पालक शिक्षक समिती, शाळा व्यवस्थापन समिती, स्वयंसहायता बचत गट, खासगी क्षेत्र, बिगर सरकारी संस्था व समूह संघटना संस्था, स्थानिक तज्ज्ञ व्यक्ती या सर्व घटकांची मदत घेऊन गावाच्या सर्वांगीण विकासाच्या बाबी आराखड्यात कशा समाविष्ट केल्या जातील याकडे सरपंच व ग्रामसेवक यांनी लक्ष देऊन नियोजनबद्ध गाव विकास आराखडा तयार केला पाहिजे, अशी महत्त्वाची व उपयुक्त माहिती प्रशिक्षणादरम्यान यशदा राज्य प्रशिक्षक मृण्मयी शेंबेकर व प्रशिक्षक किशोर शिताळे यांनी सांगितले. तसेच राजिप अलिबाग विस्तार अधिकारी हंसराज कोकर्डे यांनी जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्या विविध योजनांची माहिती सांगून तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत योजनांची माहिती पोहोचवून लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पं.स. विस्तार अधिकारी डी.एन. दिघीकर यांनी केले.
यावेळी राजिप अलिबाग विस्तार अधिकारी हंसराज कोकर्डे, राजिप अलिबाग लेखापाल प्रथमेश राणे, म्हसळा पंचायत समिती विस्तार अधिकारी डी.एन. दिघीकर, विस्तार अधिकारी परशुराम पाटील, प्रशासन अधिकारी हेमंत माळी, यशदा राज्य प्रशिक्षक मृण्मयी शेंबेकर, यशदा प्रशिक्षक किशोर शिताळे, तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, प्रशासक, ग्रा.पं. संगणक परिचालक उपस्थित होते.