घंटागाडीत कचरा न टाकल्यास दंडात्मक कारवाई
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पाली नगरपंचायत हद्दीत घरोघरी घंटागाडी जाते, तरीदेखील चौकाचौकातील कचराकुंड्यांमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. त्यामुळे शहरातील कचराकुंड्या ओसंडून वाहात आहेत. परिणामी, रस्त्याच्या आजूबाजूला संपूर्ण घाणीचे साम्राज्यासह दुर्गंधी पसरते. यावर उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत अभियानांतर्गत पाली नगरपंचायतीने संपूर्ण पाली शहर नगराध्यक्षा प्रणाली शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मुख्याधिकारी, सर्व नगरसेवक व नगरसेविका यांच्या सहकार्याने शहरातील रस्त्यांच्या कडेला, मुख्य चौकात ठेवलेल्या कचराकुंड्या हटवण्यास सुरुवात केली असून, त्याठिकाणी नगरपंचायत माध्यमातून वृक्षारोपणदेखील करण्यात येत आहे.

दरम्यान, हटविण्यात आलेल्या कचराकुंडी ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही कोणी कचरा टाकताना आढळल्यास घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश फलकदेखील लावण्यात आले आहेत. नगरपंचायतच्या या कचराकुंडी मुक्त पाली शहर या स्तुत्य उपक्रमाचे पाली शहरातील नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. तसेच पाली शहरातील सर्व कचरा टाकण्यात येणाऱ्या डंपिंग ग्राऊंडला संरक्षण भिंत नसल्यामुळे कचरा इतरत्र बाजूला असलेल्या रस्त्यावर पसरत असते आणि तेथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास होतो, हे लक्षात घेऊन नगरपंचायत लवकरच डंपिंग ग्राऊंडला संरक्षण भिंत बांधणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

1) रस्ते/मार्गावर घाण करणे - 150 रुपये 2) सार्वजनिक ठिकाणी थुंकणे - 100 रुपये. 3) उघड्यावर लघवी करणे - 100 रुपये 4) उघड्यावर शौच करणे- 500 रुपये 5) उघड्यावर कचरा करणे- 1,000 रुपये 6) प्लास्टिक, थर्माकोल वस्तूचे उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, साठवणून करणे- प्रथम वेळेस 5,000 रुपये, द्वितीय वेळेस 10,000 रुपये, त्यानंतर 25,000 रुपये इतका दंड आकारण्यात येणार आहे.
नागरिकांनी आपला कचरा घंटागाडीतच टाकावा. जेणेकरून आपले पाली शहर स्वच्छ व सुंदर राहील. इतरत्र कुठेही कोणी कचरा टाकताना आढळल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
प्रणाली शेळके, नगराध्यक्षा
कचराकुंडी मुक्त पाली शहर या स्तुत्य उपक्रम पाली नगरपंचायतीने सुरू केला असून नगरपंचायत कर्मचारी शहरात कचरा विलगीकरणाचे महत्त्व नागरिकांना पटवून देतील. शहरातील सर्व प्रभागातून विलगीकरण केलेला कचरा संकलित करण्यासाठी प्रशासन टेंडर प्रक्रिया पूर्ण करेल. यानंतर संपूर्ण शहरात घनकचरा व्यवस्थापन व विलगीकरणाचे काम सुरु होईल.
विद्या येरूनकर, मुख्याधिकारी