पालीची शुद्ध पाणीपुरवठा योजना अडकली लालफितीत

अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत

। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।

अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहरातील जनतेला वर्षानुवर्षे शुद्ध पाण्याची प्रतीक्षा आहे. विविध राजकीय पक्ष, नेते, राजकारण्यांच्या फसव्या आश्‍वासनांचा पालीकरांना अक्षरशः वीट आल्याची परिस्थिती दिसून येते. पाली शहरासाठी शुद्धपाणी योजना ही 1974 साली मंजूर झाली आहे. तिचा एकूण खर्च आता 27 कोटींवर गेला आहे. मात्र, ही 27 कोटींची शुद्ध पाणीपुरवठा योजना लालफितीत अडकली आहे. राजकीय हेवेदावे आणि प्रशासकीय बाबी यामध्ये ही योजना अडकल्यामुळे पालीकर अजूनही शुद्ध पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

पालीकरांना थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणीपुरवठा केला जातो. इतरही गावातील लोक अंबा नदीचे पाणी वापरतात. सांडपाणी, कंपन्यांमधील प्रदूषित पाणी, घाण व कचरा, वाळूउपसा यामुळे येथील नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आले आहे. याशिवाय नदीच्या पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात हिरवळ तयार झाली आहे. सुधागड तालुक्यात पाली, राबगाव, आंबोले, रासळ, कानसळ, हेदवली, जांभुळपाडा या गावाजवळ अंबा नदीच्या काठावर अनेक कंपन्या, फार्महाऊस, निवासी संकुल उभे राहिले आहेत. कंपन्यातील दूषित रसायनयुक्त पाणी आणि सांडपाणी थेट अंबा नदीच्या पात्रात सोडण्यात येते. तसेच नदीतून वाहून आलेले प्रदूषित व सांडपाणी पुढे वाहून न जाता येथेच साठून राहते. तसेच रसायन व सांडपाण्याबरोबरच कचरा आणि घाणदेखील साठते. नदीवर महिला धुणीभांडी करतात. याबरोबरच नदीत टाकलेले निर्माल्य कुजल्यानेदेखील पाणी खराब होते. परिणामी, ते अधिक दूषित झाले आहे. पाण्याला उग्र स्वरुपाची दुर्गंध येते, चवही खराब लागते. पाणी प्रदूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यामुळे अंबा नदीच्या पाण्यावर अवलंबून असणार्‍या लोकांचे जनजीवन धोक्यात आले आहे.

दूषित पाणी हे पिण्यायोग्य नसल्याने लोक, जनावरे यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. वाकण-पाली-खोपोली राज्य महामार्गावरील अंबा नदीच्या नवीन पुलाचे काम सुरू असल्याने अंबा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात गढूळ व दूषित होत आहे. त्यामुळे काही दिवसांपासून पालीकरांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. जॅकवेलजवळच पुलाचे काम सुरू असल्याने तेथील नदीपात्रात चिखल, माती, राडारोडा व सिमेंट मिसळून पाणी खराब होत आहे. शिवाय, पाण्याचा रंगदेखील बदलत असल्याची परिस्थिती वारंवार पहावयास मिळते. अशातच पालीकरांना पिण्याचे शुद्ध पाणी कधी मिळणार, हा प्रश्‍न प्रत्येकाच्या मनात आहे.

पालीकर, भाविकांना दूषित पाणीपुरवठा
पालीकरांना येथील अंबा नदीचे पाणी नळाद्वारे पुरविण्यात येते. वितरित होणार्‍या या पाण्यावर कोणतेही शुद्धीकरण व क्लोरीनेशनची प्रक्रिया न करता थेट पालीकरांना पाणी पुरविले जाते. अशा प्रकारे कित्येक वर्षे पालीकरांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. पाली हे अष्टविनायक क्षेत्र आहे. येथे रोज हजारो भाविक येत असतात. पालीची स्थायी लोकसंख्यादेखील पंधरा हजारांहून अधिक आहे. अशा परिस्थितीत भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व खराब पाणी प्यावे व वापरावे लागत आहे. आत्तापर्यंत येथील नळांतून चक्क जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे आणि किडे अनेकवेळा बाहेर आले आहेत. गाळ, चिखल आणि शेवाळ येणे हे तर नेहमीचेच आहे.  
Exit mobile version