श्री चंडिका देवीचा पालखी सोहळा

। तळा । वार्ताहर ।

तळा शहराची ग्रामदेवता श्री चंडिका देवीच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन दि.24 व 25 जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावर्षीचा यजमान पदाचा मान असलेल्या राणेची वाडी ग्रामस्थांना मिळाला. श्रीकांत वेदक यांच्या घरापासून श्री चंडिका देवी मंदिरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखी मिरवणुकीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आनंदाने सहभागी झाले होते.

टाळ मृदुंगाच्या तालावर भाविक भजनात दंग होऊन नाचत होते. भजनात पुरुषांसह महिलांचा सहभागही लक्षणीय होता. तर, दुसरीकडे खालू बाजाच्या तालावर तरुणी व तरुणांनी लेझीम पथकावर ठेका धरला होता. यावेळी लहान मुलांनी ऐतिहासिक शिवकालीन वेशभूषा साकारली. तसेच, मर्दानी लाठीकाठीचा थरार देखील नागरिकांना अनुभवायला मिळाला. एकंदरीत चंडिका देवीचा पालखी सोहळा नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.

Exit mobile version