छबिना उत्सव : पाळण्यात केस अडकल्याने महिला गंभीर

। महाड । प्रतिनिधी ।
महाड येथील विरेश्‍वर मंदिरात दरवर्षी छबिना उत्सव साजरा होतो. वीरेश्‍वरच्या दर्शनासाठी हजारो भाविक याठिकाणी जातात. सलग दोन वर्ष कोरोनामुळे कोणत्याही प्रकारचा उत्सव साजरा करता आला नाही. मात्र जिल्ह्यातील निर्बंध हटविल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात अपघात घडला. मनोरंजनासाठी ठेवण्यात आलेल्या पाळण्यात केस अडकल्याने माणगाव तालुक्यातील निजामपुर येथील पल्लवी सुरज कोलणकर (वय 30) ही महिला गंभीर जखमी झाली. छबिना उत्सवासाठी त्या महाड येथे आल्या होत्या.

याप्रकरणी आरोपी इंदल दयाराम चौहान (रा. उत्तरप्रदेश) याने या छबिना उत्सवासाठी हाताने हलविणारा पाळणा आणला होता. या पाळण्याचा आनंद घेण्यासाठी पल्लवी पाळण्यात बसल्या. आरोपी इंदल चौहांन याने कोणत्याही प्रकारच्या सुरक्षेची काळजी न घेता हलगर्जीपणाने पाळणा हलविला. त्यावेळे पल्लवीचे केस त्या पाळण्यामध्ये अडकून अपघात झाला.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पल्लवी यांना उपचारासाठी पाठविले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढिल उपचाराकरीता त्यांना मुंबई येथे पाठविण्यात आले. याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढिल तपास उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश तांबे व पोलीस निरीक्षक खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस हवालदार बामणे करीत आहेत.

Exit mobile version