आदिवासी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
| नेरळ | प्रतिनिधी |
वादळी वारा आणि अवकाळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी कर्जत तालुका आदिवासी संघटनेने केली आहे. तसेच बेघर झालेल्या कुटुंबांना तात्काळ राहण्यासाठी जागा उपलब्ध करावी, त्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीचे निवेदन आदिवासी संघटनेने तहसीलदारांना दिले आहे.
कर्जत तालुक्यात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस पाच ते सहा दिवसापासून पडत आहे. त्या अवकाळी पावसाने व वादळी वार्याने खूप मोठ्या प्रमाणात घराचे आणि फळ झाडाचे नुकसान झाले आहे काही लोक बेघर झाले आहेत. तसेच साठवून ठेवलेले धान्य ही पावसाने भिजून गेले आहे. त्यामुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रामुख्याने बेडीसगाव (शेलू), खांदन (मोग्रज), मोरेवाडी (पाथरज), खडकवाडी (पाषाणे) आणि अन्य ठिकाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान आले आहे. दरम्यान, कर्जत तालुका आदिवासी समाज संघटनेने शासनाकडे नुकसानग्रस्तांचे तातडीने पंचनामे व तातडीची मदत द्यावी आणि बेघर झालेल्या कुटुंबांना तात्काळ राहण्याची व्यवस्था करून देण्याची मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, अशी समाज संघटनेची मागणी आहे.
परशुराम दरवडा, अध्यक्ष,
आदिवासी समाज संघटना कर्जत
अवकाळी पाऊस व वादळी वार्याने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंचनामे शासनाकडे पाठवले जातील आणि त्यानंतर शासनाच्या आदेशाने कार्यवाही केली जाईल.
डॉ. शीतल रसाळ, तहसीलदार, कर्जत