। पंढरपूर । प्रतिनिधी ।
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा मार्गे पंढरपूर-विजापूर रेल्वेमार्ग योजनेस रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद देणारे व संबधित विभागास आदेशीत करणारे पत्र जाहिर करण्यात आले आहे.
विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आ.समाधान आवताडे यांनी, जिल्ह्यातील सांगोला- मंगळवेढा-सोलापूर व पंढरपूर-विजापूर या मार्गांना जोडणारी रेल्वे सुविधा मंजूर व्हावी यासाठी पंढरपूर – मंगळवेढा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची प्रत्यक्ष भेट घेतली होती. या भेटीत हा रेल्वे प्रकल्प सुरु होण्याबाबत आवश्यक बाबींची पूर्तता करून, त्यासाठी लागणारा अर्थिक निधी उपलब्ध करावा व लवकरात लवकर संबंधित योजनेचे काम सुरु करावे अनुषंगाने चर्चा करण्यात आली. तसेच आवश्यक तो पत्रव्यवहार करण्यात आला.
आ.आवताडे यांनी पत्रात नमुद केल्यानुसार, तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये अनेक वारकरी भाविक वर्षभरातील विविध वारी सोहळ्यानिमित्ताने कर्नाटक राज्यातून मंगळवेढामार्गे पंढरपूरला जातात. संपूर्ण महाराष्ट्रात मंगळवेढा ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक वारकरी भाविक पंढरपूरहून परतीच्या मार्गावर जात असताना मंगळवेढा येथे विविध संताच्या दर्शनासाठी जात असतात.
सन 2013 साली सादर झालेल्या रेल्वे अर्थिक अंदाजपत्रकात पंढरपूर – मंगळवेढा – विजापूर या नवीन रेल्वे मार्गास मंजुरी दिली होती. 2018 साली या रेल्वेमार्गाचा सर्व्हे होऊन त्याचे बजेट केंद्रीय रेल्वे पुणे विभाग यांनी केंद्रीय रेल्वे प्रशासनाकडे सादर केले. या सर्व्हेनुसार हे काम चालू होणे अपेक्षित होते. परंतु हा प्रकल्प स्थगित ठेवणेबाबतचे पत्र 6 ऑगस्ट 2018 नुसार मध्य रेल्वे विभाग पुणे यांना कळविण्यात आले.
हा रेल्वे प्रकल्प कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला जोडणारा असून यामुळे भाविक व शेतकरी यांना प्रवास वाहतूक अनुषंगाने दळणवळण सुविधा सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग येथील जनतेच्या दृष्टीने खुप महत्वाचा आहे. या महत्त्वकांक्षाी योजनेस मान्यता मिळाल्यामुळे समाधान आवताडे यांनी समाधान व्यक्त केले असून याकामी खा. रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शन लाभत असल्याचे आवर्जून सांगितले.