पंकज ओसवाल यांच्या पाठपुराव्याला यश

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत येथील पोस्ट कार्यालयातील खंडित वीज पुरवठ्यावर मात करण्यासाठी आणलेले जनरेटर साडेतीन वर्षे बंद होते. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आला आणि हे जनरेटर पूर्ववत सुरू झाले.

कर्जत येथील टपाल कार्यालयात असलेले जनरेटर ऑक्टोबर 2022 पासून बंद होते. येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांच्याकडून अनेक वर्षे बंद असलेल्या जनरेटर बद्दल ऑगस्ट 2025 पासून सतत पाठपुरावा सुरू होता. कर्जत तालुक्यात विजेची समस्या कायम असते. त्यामुळे सरकारी कामासाठी जनरेटरची आवश्यकता येथील सरकारी कार्यालयांना भासत असते. कर्जत येथील पोस्ट ऑफीसमध्ये लाईट गेल्यानंतर कारभार देखील ठप्प होत होता. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांची वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर निर्माण होणारी समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी टपाल विभागाच्या मुंबई येथील मुख्यालयात याबाबत माहिती विचारली होती. तेव्हा मुंबई येथील जनरल पोस्ट कार्यालयातून कर्जत पोस्ट कार्यालयाला 2014 मध्ये 15 केव्हिए क्षमतेचे जनसेट उपलब्ध करून दिला होता, अशी माहिती दिली. त्याचवेळी काही तांत्रिक बिघाडामुळे हे जनरेटर बंद पडले असल्याचे देखील कळवले. त्यावर दुरुस्तीचे काम का झाले नाही, याची माहिती विचारली असता कर्जत कार्यालयाने जनरेटर बंद असल्याबद्दल कोणतीही मुंबई येथील जनरल पोस्ट कार्यालयाला माहिती दिली नव्हती. त्यानंतर कर्जत येथील जनरेटर पूर्ववत होण्यासाठी तात्काळ हालचाली केल्या जातील, असे आश्वासन मुंबई येथील जनरल पोस्ट कार्यालयाने दिले होते. त्यानंतर तब्बल साडेतीन वर्षांनी एप्रिलमध्ये कर्जत टपाल कार्यालयातील बंद असलेले जनरेटर पुन्हा सुरू झाले आहे.

Exit mobile version