पार्किंगसाठी उभारले पाच विशेष वाहनतळ
| पनवेल | प्रतिनिधी |
दिवाळीच्या खरेदीसाठी पनवेल शहरात होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महापालिका व वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे पाच ठिकाणी तात्पुरत्या वाहनतळांची व्यवस्था केली आहे. या वाहनतळांवर सुमारे 500 मोटारी उभ्या करता येणार असून, 1 नोव्हेंबरपासून ही व्यवस्था कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. यासंदर्भात वाहतूक पोलीस विभागाकडून लवकरच अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये वाढणारी गर्दी लक्षात घेऊन महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी पनवेल शहर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आणि प्रभाग अधीक्षक राजेश डोंगरे उपस्थित होते. बैठकीत बापट वाडा येथील सुरू असलेल्या बांधकामाच्या जागेत 60 मोटारी, कर्मवीर भाऊराव चौक ते कर्नाळा भाजी मार्केटदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा 50 हून अधिक मोटारी, नाट्यगृह व परिसरातील वाहनतळावर 120 मोटारी, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाशेजारील मोकळ्या जागेत 250 हून अधिक मोटारी उभ्या करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या जागा वाहनतळासाठी सज्ज करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, वाहतूक नियमनासाठी महापालिकेने महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 60 जवान पोलिसांच्या मदतीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. हे जवान शहरातील विविध वाहतूक सिग्नलवर कार्यरत असून, दिवाळीच्या काळात अतिरिक्त मनुष्यबळही तैनात करण्याची मागणी वाहतूक पोलिसांनी केली आहे. दिवाळी खरेदीसाठी शहरात येणाऱ्या नागरिकांनी निर्धारित वाहनतळांचाच वापर करावा. रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी केले आहे.
