रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहनचालक त्रस्त
| पनवेल | प्रतिनिधी ।
पनवेल शहरातील तालुका पोलीस ठाण्यालगत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी या ठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. कामासाठी रस्ता खोदण्यात आल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या मार्गावर मोठा ताण निर्माण झाला आहे. या परिसरात वाहनांची सतत वर्दळ असल्याने विशेषतः गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडीची समस्या अधिक तीव्र होत आहे.
तालुका पोलीस ठाण्याजवळील हा महत्त्वाचा चौक असून, येथून चार प्रमुख मार्गांना जोडणी मिळते. एक मार्ग पनवेल न्यायालयाकडे, दुसरा ठाणा नाक्याकडे, तिसरा तहसील व प्रांत कार्यालयाच्या दिशेने, तर चौथा मार्ग उपजिल्हा रुग्णालयाकडे जातो. त्यामुळे या परिसरातून दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरिक आणि वाहनांची ये-जा सुरू असते. रस्त्याचे काम सुरू असलेल्या भागाभोवती बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मात्र, काही वाहनचालक हे बॅरिकेड्स बाजूला करून अथवा त्यातून मार्ग काढत पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आधीच अरुंद झालेल्या मार्गावर वाहनांची गर्दी वाढून वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. या परिस्थितीत वाहतूक पोलिसांची नियुक्ती करून वाहनचालकांना योग्य मार्गदर्शन करणे, बॅरिकेड्सची योग्य व्यवस्था करणे आणि वाहतूक शिस्तीचे पालन करून घेणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतूक व्यवस्थापनाकडेही प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.







