| पनवेल | प्रतिनिधी |
हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, भोकरपाडा येथे व्हॉट्सॲप खाते हॅक करून एका व्यक्तीची तब्बल 12 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार 22 ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आला. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने तक्रारदाराचा व्हॉट्सॲप क्रमांक हॅक केला. त्यानंतर तक्रारदार स्वतः त्यांच्या अकाऊंटंटशी संदेशाद्वारे संवाद साधत असल्याचा भास निर्माण केला. या माध्यमातून अकाऊंटंटला एका बँक खात्यावर 12 लाख रुपये वर्ग करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार रक्कम वर्ग झाल्यानंतर फसवणुकीचा प्रकार समोर आला. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक भुजबळ करीत आहेत.






