पनवेलमध्ये सलग दोन हत्याकांडाच्या घटनांमुळे खळबळ

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल तालुक्यात सलग दोन दिवसांत घडलेल्या दोन हत्याकांडांनी संपूर्ण परिसर हादरून गेला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रविवारी बंबई पाडा येथे एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी उसली गावाजवळ आणखी एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.

रविवारी सकाळी बंबई पाडा परिसरात एका महिलेचा मृतदेह घरात आढळून आला होता. तिच्या गळ्यावर आढळलेल्या खुणांवरून तिचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असतानाच अवघ्या काही तासांत दुसरी धक्कादायक घटना समोर आली. सोमवारी उसली गावाजवळ सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामाच्या ठिकाणी दोन पिलरच्या मधोमध एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख अमित राय अशी झाली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या डोळ्यांमध्ये भोसकल्याच्या खुणा आढळून आल्याने ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दोन्ही घटनांची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली असून, पनवेल तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन दिवसांत दोन खून झाल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

पोलीस पथकांनी दोन्ही ठिकाणी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून, या हत्यांमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य किंवा इतर गुन्हेगारी कारणांचा कोन तपासात तपासला जात आहे. या प्रकरणांचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि संशयितांची चौकशी यावर भर दिला जात आहे. सलग घडलेल्या या दुहेरी हत्याकांडामुळे पनवेल तालुका हादरला असून नागरिकांनी तातडीने कडक पोलीस बंदोबस्त आणि गुन्हेगारीवर आळा घालण्याची मागणी केली आहे.

Exit mobile version