पनवेल-कर्जत प्रवास होणार सुसाट

प्रकल्पाचे 47 टक्के काम पूर्ण
| मुंबई | प्रतिनिधी |
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वेच्या दुहेरीकरण प्रकल्पाचे 47 टक्के काम पूर्ण झाले आहे. अडीच हजार कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) ठेवले आहे.

पनवेल-कर्जत उपनगरीय मार्गिकेमुळे पनवेलमार्गे सीएसएमटी-कर्जत असा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. ते लक्षात घेऊन 2015 च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी पनवेल-कर्जत प्रकल्पास हिरवा कंदील दाखवला होता. एमआरव्हीसीच्या माध्यमातून त्यास मंजुरी देण्यात आली होती. मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3 (एमयूटीपी 3) अंतर्गत पनवेल ते कर्जत दुहेरी रेल्वे मार्गिका उभारण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत 47 टक्के काम पूर्ण झाले आहे.

29.6 किमीच्या पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्गावर पनवेल, चौक, मोहापे, चिखले व कर्जत अशी पाच स्थानके आहे. त्याशिवाय फलाट, पादचारी पूल, भुयारी मार्ग आदी कामे होणार आहेत. 3.12 किमीचे तीन बोगदे असणार आहेत. मार्गावर दोन रेल्वे उड्डाणपूल, आठ मोठे आणि 36 लहान पूल असणार आहेत.
प्रकल्पासाठी 135.893 हेक्टर जमीन लागणार आहे. आवश्यक असलेल्या सर्व जमिनीचा ताबा रेल्वेला मिळाला आहे. प्रकल्पासाठी 57.16 हेक्टर खासगी जमीन संपादित करण्यात आली आहे. 30 मे 2022 रोजी 9.131 हेक्टर वनजमिनीला मंजुरी मिळून त्या ठिकाणी काम करण्याची परवानगी मिळाली असून कामही सुरू झाले आहे.

प्रस्तावित रेल्वेमार्गावर नढाल, किरवली आणि वावर्ले असे तीन बोगदे उभारण्यात येणार आहेत. त्यांपैकी वावर्ले बोगदा 2625 मीटर लांबीचा आहे. आतापर्यंत 2625 पैकी 1691 मीटर जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले आहे. पुढील काम प्रगतिपथावर आहे. नढाल बोगद्याची लांबी 219 मीटर असून आतापर्यंत जमिनीखाली उत्खनन पूर्ण झाले आहे. 219 पैकी 68 मीटर आरसीसी अस्तरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. किरवली बोगदा 300 मीटर लांबीचा आहे. 122 मीटर जमिनीखालील उत्खनन पूर्ण झाले असून पुढील काम प्रगतिपथावर आहे.

Exit mobile version