खा. श्रीरंग बारणे करणार कामांची पाहणी
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
मावळ लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाकांक्षी पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, प्रकल्पाचे सुमारे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे उद्या (मंगळवारी) रेल्वे अधिकाऱ्यांसह संपूर्ण मार्गिकेची पाहणी करणार आहेत.
रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत खासदार बारणे सकाळी पाहणी दौरा करणार असून, सर्व स्थानकांसह कर्जत रेल्वे कॉरिडॉरचीही तपासणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे पनवेल आणि कर्जतदरम्यान थेट उपनगरीय रेल्वे सेवा उपलब्ध होणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
29.6 किलोमीटर लांबीच्या या दुहेरी रेल्वे मार्गिका प्रकल्पाची उभारणी मुंबई रेल्वे विकास महामंडळामार्फत मुंबई नागरी परिवहन प्रकल्प 3 अंतर्गत सुमारे 2,782 कोटी रुपयांच्या खर्चातून करण्यात येत आहे. या मार्गामुळे कल्याणमार्गे धावणाऱ्या रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे.
प्रकल्पांतर्गत मोठे आणि छोटे पूल, उड्डाणपूल, भुयारी मार्ग, बोगदे आणि अस्तरीकरणाची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. कर्जत येथील रेल्वे उड्डाणपूल पूर्ण झाला असून, सध्या रुळ जोडणीचे काम वेगाने सुरू आहे. तसेच पनवेल रेल्वे उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.







