पनवेल हत्‍याकांडः अवघ्या तीनशे रुपयांसाठी केली हत्या

आरोपीला पोलिसांकडून अटक

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करून पळून जाणाऱ्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. सचिन अरुण शिंदे (रा. बौद्धवाडा, औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. अवघ्या तीनशे रुपयांसाठी ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

पनवेल रेल्वेस्टेशन जवळील मालधक्का या ठिकाणी विकी गोपाळ चिंडालिया (29) या तरुणाची गळ्याच्या उजव्या बाजूस तीक्ष्ण हत्याराने भोसकून हत्या करण्यात आली. पनवेल शहर पोलिसांनी अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी प्रकाश पवार, बजरंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे व पोलीस अंमलदार असे तीन वेगवेगळे पोलीस पथक तयार करण्यात आले. यावेळी गुप्त बातमीदाराकडून व तांत्रिक तपासावरून हा गुन्हा सचिन अरुण शिंदे याने केला असल्याची माहिती मिळाली.

आरोपी हा त्याच्या मुळगावी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार सपोनी बजरंग राजपूत व पोलीस पथकाने आरोपीच्या मुळगावी त्याचा शोध घेतला व आरोपीला 10 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता 8 ऑगस्ट रोजी पहाटे चारच्या सुमारास मयत विकी याच्याकडे असलेल्या 500 रुपयांपैकी 300 रुपये आरोपी सचिन शिंदे याने मागितले. यावेळी ते देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात तू तू मैं मैं सुरू झाली. त्याचा राग आल्याने सचिन शिंदे याने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. त्यात विकी चिंडालिया याचा मृत्यू झाला.

Exit mobile version