| पनवेल | प्रतिनिधी |
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या स्पर्धेत 10 लाख लोकसंख्येच्या गटात 34 शहरांमध्ये पनवेल पालिकेने पाचवा क्रमांक पटकावला आहे. तसेच देशातील 382 शहरांमध्ये 17 वा क्रमांक पनवेलला मिळाला आहे. कचरामुक्तीसाठी तीन तारे (थ्रीस्टार) आणि पनवेलला हागणदारीमुक्त शहरासाठी ++ ओडीएफ हा दर्जा मिळाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची गुणांची कामगिरी उत्कृष्ट असल्याने पनवेल पालिकेचे स्वच्छतेचे प्रगतीपुस्तकात समाधानकारक असल्याची चर्चा पालिका प्रशासनासह नागरिकांमध्ये आहे.
आयुक्त देशमुख यांचा दूरदृष्टीपणा आणि शहरी प्रशासनाचा असलेल्या दांडग्या अनुभवामुळे पालिका प्रशासनाने भूमिकेत बदल केला. यामुळे विनाअट सिडकोकडून नागरी कचरा हस्तांतरण तातडीने केले व इतर सेवा हस्तांतरणाची प्रक्रीया गतीने झाली. तसेच मोठ्या क्षमतेने पालिका क्षेत्रातील स्त्यावरील कचरा उचलण्यासाठी दिवसभरातील 16 तास दिवसरात्र यंत्रणा उभारल्याने पालिका क्षेत्रातील कच-याचे चित्र बदलले. कचरा रस्त्यावरुन थेट कचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पापर्यंत जाऊ लागला. हा सर्व घटनाक्रम खरा असला तरी तरी पालिकेमध्ये 70 टक्के भाग नियोजनबद्ध उभारलेल्या सिडको वसाहतींचा असल्याने पालिकेला राज्यातील 10 लाख लोकवस्तीच्या गटात पहिला क्रमांक मिळवणे पुढील काळात शक्य होणार आहे. परंतू यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामान्य नागरीक अशा त्रीसूत्रींचा सहभाग असणे गरजेचे आहे. पनवेल पालिकेने यंदा पालिका क्षेत्रातील विविध चौकात टाकाऊपासून टिकाऊ अशा विविध वस्तूंची कलाकृती बनवून त्याचे प्रदर्शन चौकाचौकांमध्ये केले. नागरिकांची सर्वाधिक वर्दळ असणा-या रस्त्याकडेच्या भिंतींच्या रंगरंगोटी करुन तेथे चित्र रेखाटली. नवी मुंबईप्रमाणे पालिकेला देशात पहिल्या पाचव्या क्रमांकाचे स्वप्न गाठता येईल परंतू त्याला प्रशासनासोबत सामान्य पनवेलकरांची साथ लागणार आहे.