। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षात 370 कोटींची वसुली केली असून हा आजवरील सर्वांधिक वसुलीचा विक्रम आहे. आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता कर विभागाने नियोजनबध्द पध्दतीने रूपरेषा आखून वसूलीचा विक्रम केला आहे.
मालमत्ता कर विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांच्या नियंत्रणाखाली योग्य उपाय योजना राबवत उच्चांकी महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा झाला आहे.
मालमत्ता कर विभागाचे कर अधिक्षक महेश गायकवाड व सुनील भोईर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यालय व चारही प्रभागामधील कर्मचारी मार्च महिना संपेपर्यंत कोणतीही सुट्टी न घेता शनिवार, रविवारी देखील कार्यालये सुरू ठेवून काम करत आहेत. पालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी थकबाकीदारांवर अटकावणी कारवाई सुरु आहे. या वसुलीसाठी महापालिकेच्यावतीने यावेळी 13 पथके कार्यरत आहेत. प्रभाग अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली ही पथके सर्व प्रभागांमध्ये वसुलीसाठी जात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेने सिडको हस्तांतरीत भाग, मार्बल मार्केट, जवाहर औद्योगिक वसाहत, तळोजा औद्योगिक वसाहत, पनवेल औद्योगिक वसाहत अशा विविध भागांमध्ये व्यवसायिक मालमत्ता करधारकांडून वसुलीची थेट कारवाई सुरु केली आहे. ज्या थकबाकीदारांना जप्ती नोटीसा दिल्या आहेत, त्यांना आता वॉरंट नोटीसा देण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. तसेच अटकावणीच्या मोहिमेलाही सुरूवात करण्यात आली आहे. याचा थकबाकीदारांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. मार्च महिन्यात दररोज एक कोटीचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा होत असून त्यामध्ये आज 19 मार्च रोजी महापालिकेने मागील वर्षाचा विक्रम मोडित काढत विक्रमी वसुली केली आहे. मागील वर्षी 31 मार्च अखेर एकुण 360 कोटीचा भरणा झाला होता. हा विक्रम यावर्षी 10 दिवस आधीच मोडित काढला आहे.