। उरण । घन:श्याम कडू ।
उरण ओएनजीसी परिसरात मंगळवारी (दि.18) सकाळी भीषण स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला. स्फोटाचा आवाज इतका तीव्र होता की, कंपनीच्या बाहेरील घरे ही हादरली. घाबरलेल्या नागरिकांनी आणि कामगारांनी तात्काळ घराबाहेर व कंपनीबाहेर धाव घेतली. मात्र, या गंभीर घटनेबाबत ओएनजीसी प्रशासनाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
स्फोटाच्या तीव्रतेमुळे कंपनी बाहेरच्या घरांना हादरे बसले. तर कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आले. कंपनीत कॉम्प्रेसर दुरुस्तीचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याचे कामगारांनी सांगितले. घटनेनंतर अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्या. मात्र, अधिकृत माहिती न दिल्याने घडलेल्या घटनेविषयी उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. घटनेनंतर नागरिकांनी ग्रामपंचायत व राजकीय नेत्यांच्या अनुपस्थितीवर रोष व्यक्त केला. ओएनजीसी प्रशासनाशी असलेल्या संबंधांमुळे स्थानिक पदाधिकारी या समस्येकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप संतप्त नागरिकांनी केला. यापूर्वी अशा दुर्घटनांमध्ये कामगारांचे बळी गेले आहेत, मात्र कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. दररोज लहानमोठ्या घटना घडत असतात. पण प्रशासन व राजकीय नेते यावर काहीच कारवाई करत नाहीत. आम्हाला जीव मुठीत धरून इथे राहावं लागतंय, अशी नागरिकांची भावना आहे. ओएनजीसी प्रशासन व स्थानिक प्रशासनाने पारदर्शकता ठेवत ठोस पावले उचलावीत, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास जबाबदारी कोणाची, हा प्रश्न उरणकरांना पडला आहे.