मशिनरींच्या स्फोटामुळे रायगड परिसर हादरला
। महाड । उदय सावंत ।
महाड-रायगड मार्गावर कोंझर या गावानजिक असलेल्या काळ जलविद्युत प्रकल्पाच्या गोदामाला बुधवारी (दि.19) दुपारी भीषण आग लागली. आगीनंतर गोदामातील मशिनरींचे स्फोट झाल्याने, रायगड किल्ल्याचा परिसर हादरून गेला होता.
काळ जलविद्युत प्रकल्पाचे हे गोदाम पत्र्याची शेड टाकून तयार करण्यात आले आहे. गोदामामध्ये वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारी टर्बाइन आणि अन्य मशिनरी ठेवण्यात आली होती. या गोदामाच्या परिसरात लागलेल्या वणव्याची आग या शेडपर्यंत पोहोचली आणि क्षणार्धात गोदामाने पेट घेतला. त्यानंतर गोदामातील मशिनरीचे तीन मोठे स्फोट देखील झाले. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली होती. या आगीची माहिती मिळाल्यानंतर महाड नगर पालिका आणि महाड एमआयडीसी अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान होवून गेले होते.
वणवा लागलेला असताना तो गोदामापर्यंत पोहोचू नये, याची दक्षता का घेण्यात आली नाही, असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे.