पनवेल मनपा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार

मेळाव्यात महाविकास आघाडीचा निर्धार
पनवेल । वार्ताहर ।
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने रणशिंग फुंकले आहे. आगामी पनवेल महापालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, कृषी उत्पन्न बाजार समिती, अर्बन बँक यांसह स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने सर्व नेतेमंडळी सह कार्यकर्त्यांमध्ये कोणतेही मतभेद न होता मनोमिलन व्हावे यासाठी पनवेलमध्ये महाविकासआघाडीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाविकासआघाडीच्यावतीने एकजुटीचे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. महम सब एक हैफ या भावनेने आघाडीतील सर्व घटकपक्षांनी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भाजपचा पराभव करून पनवेल महापालिका भाजपच्या छाताडावर बसून घेऊ, असा निर्धार यावेळी महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आला.
यावेळी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी बोलताना सांगितले की, महापालिकेचे काम चालु असताना मालमत्ता कराच्या अडचणी आहेत त्याचबरोबर पाण्याच्या अडचणी आहेत. शिवसेना सल्लागार बबन पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काम करत आहोत.

येत्या काही दिवसातच मालमत्ता करामध्ये जी 30% सवलत दिली होती ती 50% देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि तसा निर्णय आम्ही लवकरात लवकर आणू हा आम्हाला विश्‍वास आहे.
प्रीतम म्हात्रे,विरोधी पक्षनेते

यावेळी महाविकास आघाडीचे अध्यक्ष तथा शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील म्हणाले की, आतापर्यंत पनवेलचा काही विकास झालेला नसल्याने एकत्रितपणे आघाडीने निवडणुका लढवायच्या आहेत. रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले की, यापूर्वी महाविकास आघाडी मध्ये शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढलो आता शिवसेना ही महाविकास आघाडीमध्ये आहे. ज्याप्रकारे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये मतदारसंघ वाढतात तसेच महानगर पालिकेमध्ये होत आहे. मेरिटवर आम्ही काम करणार आहोत.

Exit mobile version