पनवेल पालिकेचा अजब कारभार! आधी बांधकाम करा, मग परवानगी घ्या

। पनवेल । दीपक घरत ।
पालिका हद्दीत कसल्याही प्रकारचे बांधकाम करायचे असल्यास पहिल्यांदा पालिकेच्या नियोजन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक असल्याचा सर्वसामान्यांचा समज आहे. पनवेल पालिकेच्या अधिकार्‍यांनी मात्र हा समज खोटा ठरवला असून, बांधकाम करा आणि मग परवानगीसाठी अर्ज करा असा अलिखित आदेशच बेकायदेशीरपणे बांधकाम करणार्‍यांना दिला आहे की, काय असा सवाल प्रभाग अ मध्ये सुरु असलेल्या बेकायदेशीर बांधकामांकडे पाहिल्यावर उपस्थित केला जात आहे.

प्रभाग अ मधील धरणा गाव परिसरात सध्या एका ढाब्याचे काम सुरु आहे. नियम धाब्यावर बसवून पालिकेच्या नियोजन विभागाची कोणतीही परवानगी न घेता सुरु असलेले हे काम जवळपास पूर्ण झाले आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकाम करणार्‍याने पालिकेच्या नियोजन विभागाकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. कोणत्याही परवानगीशिवाय सुरु असलेल्या या बांधकामाविषयी पालिकेचे उपायुक्त कैलास गावडे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित बांधकाम करणार्‍याने परवानगीसाठी नियोजन विभागाकडे अर्ज केला असल्यास परवानगी आधी बांधकाम करण्यास काहीच हरकत नसल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच काही करणास्तव परवानगी नाकारल्यास संबंधित बांधकाम बेकायदेशीर ठरवले जाईल, असे उत्तर दिल्याने अधिकार्‍यांच्या या उत्तराने सभ्रम निर्माण होत आहे. पनवेल पालिका हद्दीत प्रभाग अ परिसरात बेकायदेशीर बांधकामांची संख्या मोठी आहे. पनवेल पालिके तर्फे मागच्या वर्षी बेकायदेशीर बांधकामांना पाठवण्यात आलेल्या नोटीसांपैकी सर्वाधिक 163 बांधकाम प्रभाग अ मधील होते.

Exit mobile version