। खांदा कॉलनी । प्रतिनिधी ।
रेल्वे अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने रेल्वे पोलीस आयुक्तालयांतर्गत पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी (दि.17 ‘झिरो मिशन डे’ अभियान राबविण्यात आले. प्रवाशांमध्ये रेल्वे सुरक्षेबाबत जनजागृती करून अपघातांना आळा घालण्याचा या अभियानाचा मुख्य उद्देश होता.
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत रेल्वे अपघातांमध्ये सुमारे 300 जणांचा मृत्यू झाला असून 331 जण जखमी झाले आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन रेल्वे सुरक्षा नियमांचे पालन करण्याबाबत प्रवाशांना मार्गदर्शन करण्यात आले. रेल्वे रुळ ओलांडणे, चालत्या रेल्वेत चढणे किंवा उतरणे, तसेच निष्काळजीपणे प्रवास करणे टाळावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी हे अभियान दर महिन्याला नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. अभियानात सहाय्यक पोलीस आयुक्त (हार्बर विभाग) नीलिमा कुलकर्णी, पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे तसेच गोपनीय शाखेचे अंमलदार जाकीर शेख, अमोल पालवे आणि सतीश अंबी उपस्थित होते. नागरिक व प्रवाशांनीही या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला.
पनवेल रेल्वे पोलिसांचे ‘झिरो मिशन डे’ अभियान
