पनवेल रेल्वे स्टेशनचा पादचारी पूल की धबधबा?

पावसाच्या पाण्यामुळे प्रवाशांचे हाल, छत्री उघडून करावा लागतोय प्रवास

| पनवेल | प्रतिनिधी ।

पनवेल रेल्वे स्टेशनवरील पादचारी पुलाची दुरावस्था सध्या प्रवाशांसाठी मोठ्या डोकेदुखीचा विषय ठरत आहे. रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे छतावरून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी थेट पुलावर आणि प्रवाशांच्या अंगावर कोसळत आहे.

पादचारी पुलावर शेड किंवा छत बसवण्यात आले असले, तरी पावसाचे पाणी आत येण्यापासून रोखण्यात हे छत पूर्णपणे अपयशी ठरले असून पुलावर अक्षरशः धबधब्यासारखे दृश्य पाहायला मिळत आहे. जोरदार पावसामुळे छतावरून आणि बाजूने पाण्याचे जोरदार फवारे आत येत असल्याने पुलावरून चालताना प्रवाशांना चक्क छत्री उघडूनच प्रवास करावा लागत आहे. कामावर जाणारे चाकरमानी आणि महिला प्रवाशांना भिजतच हा पूल पार करावा लागत असून, साचलेल्या पाण्यामुळे घसरून पडण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. “प्रशासन प्रवाशांकडून भाडे वसूल करते, पण मूलभूत सोयी-सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे; पुलावर असूनही भिजावे लागत असेल तर या छताचा काय उपयोग?” असा उद्विग्न सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. प्रवाशांना रोज अशा त्रासदायक अनुभवांना सामोरे जावे लागत असून, प्रशासनाने या गळक्या छताची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Exit mobile version