। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेलजवळील आसुडगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. येथील गावदेवी मंदिरासमोरील एका इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदलेल्या आणि पाण्याने गच्च भरलेल्या उघड्या खड्ड्यात पडल्यामुळे एका 12 वर्षीय बालकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण आसुडगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
आसुडगाव येथील गावदेवी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सुरक्षेसाठी या बांधकामाच्या बाजूने पत्रे मारण्यात आले होते. परंतु, तिथे बांधकामासाठी खोदलेला मोठा खड्डा उघडाच होता, ज्यामध्ये पावसाचे पाणी साचून तळ्यासारखे स्वरूप आले होते. पियुष नावाचा हा 12 वर्षीय मुलगा या ठिकाणी अचानक पाण्यात पडला आणि बुडू लागला. मुलगा पाण्यात पडल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने कळंबोली अग्निशमन दल आणि खांदेश्वर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी रबरी बोट, दोरी आणि सुरक्षा उपकरणांच्या साहाय्याने तात्काळ पाण्यात उतरून शोधमोहीम सुरू केली. सुमारे 30 मिनिटांच्या अथक शोधमोहीमनंतर जवानांनी मुलाला पाण्यातून बाहेर काढले. त्याला तातडीने उपचारासाठी पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. अशा प्रकारच्या उघड्या आणि धोकादायक खड्ड्यांमुळे निष्पाप बालकाचा जीव गेल्याने आसुडगाव ग्रामस्थांमध्ये मोठा शोक पसरला असून, निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. खांदेश्वर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.







