पनवेलकरांना पांढऱ्या जांभळांची भुरळ

मधुमेह नियंत्रणासाठी गुणकारी

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील खवय्यांमध्ये सध्या पांढऱ्या जांभळांची चांगलीच चर्चा रंगली आहे. पारंपरिक जांभळ्या रंगाच्या जांभळांऐवजी पांढऱ्या रंगाची जांभळे बाजारात दाखल झाली असून, त्यांच्या चवीसह आरोग्यदायी गुणधर्मांमुळे ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे.

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील भवानीनगर येथील प्रगतिशील शेतकरी चैतन्य कुलकर्णी यांनी सेंद्रिय पद्धतीने पांढऱ्या जांभळांचे उत्पादन घेतले आहे. ही जांभळे सध्या नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटसह पनवेलच्या बाजारात विक्रीस उपलब्ध असून, 200 ते 300 रुपये किलो दराने विकली जात आहेत. पांढऱ्या जांभळांमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. मधुमेह नियंत्रण, शरीराला थंडावा, वजन नियंत्रण तसेच त्वचा व हृदयाच्या आरोग्यासाठी हे फळ उपयुक्त मानले जात असल्याने ग्राहकांची पसंती मिळत आहे. चवदार, रसाळ आणि पौष्टिक अशा या आगळ्यावेगळ्या फळामुळे पनवेलकरांची उत्सुकता वाढली असून, मागणी लक्षात घेता पांढऱ्या जांभळांच्या लागवडीत आणखी वाढ करण्याचा मानस असल्याचे शेतकरी चैतन्य कुलकर्णी यांनी सांगितले.

Exit mobile version