ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
। उरण । वार्ताहर ।
अलिबागचा पांढरा कांदा काढणीस सुरुवात झाली असून, हा कांदा आता विक्रीसाठी उरण बाजारात उपलब्ध होऊ लागला आहे. लहान कांदा 200 रुपये माळ, तर मोठा कांदा 250 रुपये माळ अशा दराने सध्या विकला जात आहे. उरण बाजारपेठेत सीटीझन हायस्कूलजवळ, राजपाल नाका, गांधी चौक, राजपाल कॉर्नर, उरण बस डेपो रोड, उरण बाजारपेठ आदी ठिकाणी कांद्याच्या माळी घेऊन विक्रेते दिसत आहेत.
चवीला रुचकर आणि औषधी गुणधर्मामुळे नावारुपाला आलेल्या या पांढर्या कांद्याची लागवड अलिबाग तालुक्यातील खानाव, उसर, वाडगाव, सागाव, रुळे, मानीभुते, नेहुली, खंडाळे, कार्ले, तळवली या गावांमध्ये केली जाते. अभ्यासकांच्या माहितीनुसार, या कांद्यात औषधी गुणधर्म आहेत. खरीप हंगामातील भातकापणीनंतर अलिबाग तालुक्यात पांढर्या कांद्याची लागवड केली जाते. भातकापणीनंतर जमिनीतील ओलावा दोन महिने टिकतो. हा जमिनीतील ओलावा पांढर्या कांद्याच्या लागवडीसाठी पुरेसा असतो. या कांद्याला वाढती मागणी आणि चांगली किंमत मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत लगतच्या गावात पांढर्या कांद्याची लागवड केली जाऊ लागली.
मागील वर्षी 223 हेक्टरवर पांढर्या कांद्याची लागवड करण्यात आली होती. यंदा अलिबाग तालुक्यात 245 हेक्टर क्षेत्रावर पांढर्या कांद्याची लागवड करण्यात आली आहे. अलिबागच्या पांढर्या कांद्याला भौगोलिक मानांकन मिळाल्याने पांढर्या कांद्याला मागणी वाढली आहे. मुंबई, पुण्यासारख्या महानगरातून कांद्यासाठी मोठी मागणी केली जात आहे. – सुजाता अशोक पाटील, हाशिवरे, तालुका आलिबाग
पांढरा कांदा गुणकारी व औषधी आहे, त्यामुळहे आम्ही उरण बाजारात विकावयास येताच न चुकता खरेदी करतो. अलिबागच्या पांढर्या कांद्याची आम्ही दरवर्षी वाट पाहात असतो. आम्ही ते बंगलोर व हैदराबाद येथे नातेवाईकाना पाठवतो. – सरोज शाह, उरण