| पोलादपूर | प्रतिनिधी |
कशेडी घाटातील जुन्या मुंबई- गोवा महामार्गावरील सन 2005 च्या अतिवृष्टीकाळात 105 फूट लांबीचा खचलेल्या डेंजर झोन रस्त्यावर दरवर्षी लाखोंचा खर्च होऊनही रस्ता खचण्याचे सातत्य कायम आहे. भुयारी मार्गाला जोडणारा नवीन मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग येथून जवळच असल्याने जुन्या महामार्गावरील 12 गाव 28 वाड्यांचा रस्ता संपर्क डेंजर झोनमध्ये दुरुस्ती कामाच्या जय भारत ठेकेदार कंपनीच्या संथगतीमुळे धोक्यात आला आहे.
यावर्षी काँक्रिटीकरण करून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे रस्ता दुरुस्ती झाल्यास हा डेंजर झोन कायमस्वरूपी सुटणार असल्याने काही काळ गैरसोय सोसण्याच्या मानसिकतेचा पावसाळा तोंडावर आल्याने कडेलोट होत आहे. सार्वजनिक बांधकाम महामार्ग विभागामार्फत फेब्रुवारी व मार्च महिन्यात सुरू झालेले काम अजूनही अपूर्ण असल्याने महामार्ग बांधकाम विभाग प्रशासन व जय भारत ठेकेदार कंपनीचे पावसाळ्यापूर्वी काम पूर्तीचे आश्वासन विरले असल्याने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पुन्हा वाहतूक निर्बंध घातला जाण्याची शक्यता कशेडी घाटातील ‘डेंजर झोन’च्या संथकामाने कमी गावसंख्येचा पोलादपूर तालुका अधिकच आकसण्याची चिन्हे दर्शवित आहे.
कशेडी घाटातील जुन्या मुंबई- गोवा महामार्गावरील भोगाव हद्दीत खचलेल्या डेंजर झोन रस्त्यावर फेब्रुवारी मार्च 2026 च्या सुमारास आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत कामाला सुरुवात करण्यात आली. याच दरम्यान रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून या मार्गावर आधी एक महिना व त्यानंतर पुन्हा एक महिना असे दोन महिने वाहतूक निर्बंध घालण्यात आले. मात्र, पावसाळ्याच्या तोंडावर संथ गतीने आधुनिक तंत्रज्ञानाच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने जुन्या महामार्गावरील 12 गावे व 28 वाड्यांतील जनतेचा रस्ता संपर्क धोक्यात आला आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. याप्रश्नी महामार्ग प्रशासन बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार पोलादपूर यांनी जय भारत कंपनी मुंबई या ठेकेदाराला कायमस्वरूपी काम करण्यासाठी प्रवृत्त तसेच आदेशित करण्याची गरज व्यक्त होत आहे.







