प्रदूषणामुळे सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ
। पनवेल । वार्ताहर ।
थंडीची चाहूल लागताच पनवेलमध्ये ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. वाढलेल्या प्रदूषणामुळे, धुलिकणांच्या त्रासामुळे श्वसनविषयक आजारांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. पालिकेच्या दवाखान्यातून मोफत उपचार केले जात असले तरी खासगी दवाखान्यातील ओघही कमी झालेला नाही.
पनवेलमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तोंडरे आणि कळंबोली या परिसरात हवेतील गुणवत्ता तपासण्यासाठी यंत्र उभारले आहे. तळोजा परिसरातील तोंडरे गावातील या यंत्रातून हवेतील गुणवत्ता पी.एम. 2.5 चा स्तर 114 पर्यंत नोंदविला जात आहे. मागील वर्षभऱात पालिकेच्या विविध दवाखान्यांमध्ये सात दिवसांपेक्षा कमी वेळेपर्यंत ताप राहीलेल्या 18,491 रुग्णांची नोंद झाली. तर सात दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप असलेल्या रुग्णांची संख्या 3,328 एवढी नोंदविली गेली. तसेच मागील वर्षभरात सात दिवसांपेक्षा कमी काळ खोकला असलेल्या रुग्णांची संख्या 11,264 होती तर, सात दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असल्या रुग्णांची संख्या 4,286 नोंदविली गेली.
मागील वर्षीपेक्षा यावेळी पालिका क्षेत्रात पालिकेच्या दवाखान्यांची संख्या 26 वर पोहचली आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांवर उपचार घेणा-या रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढली आहे. हे वर्ष संपण्यासाठी अजून महिना शिल्लक असेपर्यंत पालिकेच्या 26 विविध दवाखान्यांमध्ये आजारावरील उपचारासाठी येणार्या रुग्णांची संख्या 5,38,990 वर पोहचली आहे. मागील वर्षी 3,08, 368 रुग्णांनी पालिकेच्या दवाखान्यात उपचार घेतले होते. वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे यंदा ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आतापर्यंत नोंदविले गेले आहेत. यावेळी सात दिवसांपेक्षा कमी दिवस ताप असलेले रुग्ण मागील वर्षीपेक्षा दुप्पटीने जास्त आढळले आहेत. यंदा 38,158 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच सात दिवसांपेक्षा अधिक काळ ताप असलेल्या रुग्णांची संख्या 5,080 नोंदविली गेली आहे. तसेच यंदा सात दिवसांपेक्षा कमी दिवस खोकला असलेले रुग्ण 17,351 तर सात दिवसांपेक्षा अधिक काळ खोकला असलेले रुग्ण 3,653 एवढे आढळले आहेत.
दरम्यान, पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने यापूर्वी साथरोगापासून बचाव करण्यासाठी वेळोवेळी घरोघरी जनजागृतीची पत्रके वाटली आहेत.