पनवेलमध्ये अपहरणाच्या संशयाने खळबळ

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल शहरातून 11 वर्षीय आफान मुकीन शेख हा मुलगा बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने फूस लावून त्याला नेल्याच्या तक्रारीवरून पनवेल शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, एका व्यक्तीने आफानचा हात धरून त्याला सोबत नेत असल्याचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित होत असून, त्याच्या सत्यतेबाबत पोलिसांकडून पडताळणी होणे आवश्यक आहे. व्हायरल छायाचित्रातील व्यक्तीची ओळख पटविण्यासह परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आफानचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आफान मुकीन शेखचा मध्यम बांधा असून सावळा रंग, गोल चेहरा, सरळ नाक, काळे बारीक केस आणि काळे डोळे आहेत. त्याने पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा आणि डोक्यावर गोल पांढरी टोपी घातली होती. डाव्या भुवईवर जुन्या जखमेची खूण आहे.

Exit mobile version