पनवेल उपजिल्हा रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात मोठ्याप्रमाणात वैद्यकीय सोयी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर किडनी विकाराने त्रस्त रुग्णांसाठी डायलिसिसची सोय करण्यात आली आहे. महिन्याला अडीचशे रुग्णांचे डायलिसिस याठिकाणी होते. याव्यतिरिक्त इतर आजारांवरसुद्धा उपचार केले जात असल्याने उपजिल्हा रुग्णालय सर्वसामान्यांसाठी संजीवनी ठरले आहे. पनवेलमध्ये आधी केवळ ग्रामीण रुग्णालय होते. माजी नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे यांच्या कार्यकाळात पनवेल नगरपरिषदेने रुग्णालयासाठी जागा उपलब्ध करून दिली. तेव्हाचे आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन पनवेलला 30 खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले. त्यानंतर सुधारित आराखडा तयार करून ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय करण्यात आले. या रुग्णालयाला नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालय असे नाव देण्यात आले.

सध्या उपजिल्हा रुग्णालयांत डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असून सहा मशीन आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किडनीग्रस्त रुग्णांचे मोफत डायलिसिस करण्यात येत आहे. याशिवाय पनवेल उपजिल्हा रुग्णालयांमध्ये प्रसुतीसाठी अनेक महिला डमिट होतात. महिन्याला जवळपास 80 मातांची प्रसूती या ठिकाणी केली जाते याशिवाय शस्त्रक्रिया करूनही प्रसुती केली जाते आहे. बालरोग विभाग, दंत व नेत्रचिकित्सा विभागही रुग्णालयात पूर्ण क्षमतेने कार्यन्वित असून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळाला आहे.पनवेल उपजिल्हा रुग्णालयाला जिल्हा कोविड सेंटरचा दर्जा तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिला होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातून हजारो कोरोना रुग्ण येथे उपचारासाठी यायचे. त्याकरिता खासगी डॉक्टरांची ही मदत घेण्यात आली होती.

व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधा
पनवेल उपजिल्हा रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला असून व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन खाटांची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे अतिदक्षता विभागामध्ये विविध आजारांवर उपचार मिळणे शक्य झाले आहे. या सोयी सुविधा असल्याने अनेक गोरगरीब गरजू रुग्णांना एक प्रकारे जीवनदान मिळत आहे. त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याची आवश्यकता भासत नाही. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनची सुविधा असल्याने विविध आजारांवर प्रकृती गंभीर असणार्‍या रुग्णांना उपचार मिळत आहेत.

पनवेल उपजिल्हा रुग्णालयांमध्ये वेगवेगळे विभाग आहेत. डायलिसिसची सुविधा किडनी विकारग्रस्तांना खर्‍या अर्थाने फायदेशीर ठरते आहे. त्याचबरोबर प्रसूती केंद्रातही शेकडो महिलांची प्रसुती केली जात आहे. कोरोनानंतर पूर्ण क्षमतेने या ठिकाणी वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

– डॉ. सचिन सपकाळ, वैद्यकीय अधीक्षक, पनवेल उपजिल्हा रुग्णालय
Exit mobile version