पनवेल उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन

शंभरऐवजी आता 200 खाटांची सुविधा; बुधवारी राज्य सरकारची मंजुरी

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता शंभरऐवजी 200 खाटांची व्यवस्था असणार आहे. त्यामुळे रुग्णांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. बुधवारी राज्य सरकारने अधिसूचना काढून हा निर्णय घेतलेला आहे. लवकरच याबाबत कार्यवाही होणे अपेक्षित आहे. बांधकाम व पदनिर्मितीबाबत स्वतंत्र कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सरकारने जाहीर केले आहे.

पनवेल उपजिल्हा रुग्णालय हे पनवेल परिसरात एकमेव सरकारी हॉस्पिटल आहे. या ठिकाणी महानगरपालिका क्षेत्रासह तालुक्यातील शेकडो रुग्ण येतात. या ठिकाणी वेगवेगळ्या आजारांवर उपचार केले जातात. त्याचबरोबर प्रसूतीगृहसुद्धा आहे. त्याचबरोबर सिटीस्कॅनची सोय या रुग्णालयामध्ये आहे. पनवेल महानगरपालिकेने हा भूखंड सार्वजनिक आरोग्य विभागाला दिला आहे. येथे सध्या शंभर खाटांची व्यवस्था असणारे रुग्णालय आहे. परंतु ही सुविधा अपुरी पडत असून, पनवेल परिसराचा झालेला विकास आणि वाढलेली लोकवस्ती पाहता, पनवेल उपजिल्हा रुग्णालय दोनशे कॉटमध्ये श्रेणीवर्धित करावे अशा प्रकारचा प्रस्ताव आरोग्य सेवा आयुक्तालयाने सादर केला होता. त्यानुसार लवकरच पनवेल उपजिल्हा रुग्णालय 200 कॉटचे असेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने जाहीर केले आहे. अवर सचिव अ.भी. मोरे यांनी 10 जुलै रोजी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. याबाबत लवकरात लवकर कार्यवाही होण्याची अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version