| पनवेल | वार्ताहर |
नागपूर येथे महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. या स्पर्धेत पनवेलची सुकन्या दुर्पता सौद महाराष्ट्राची सर्वोत्कृष्ट बॉक्सर ठरली आहे.
नागपूर येथे 22 ते 26 जुलैदरम्यान महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा झाली. या स्पर्धेत सब ज्युनियर मुली या 37-40 किलो गटात दुर्पता सौद हिने सुवर्णपदक पटकावले असून, तिला सर्वोत्कृष्ट ‘बॉक्सर ऑफ द चॅम्पियनशिप’ म्हणूनही गौरविण्यात आले. दुर्पता, केव्ही कन्या हायस्कूलमध्ये नववीत शिकत आहे. चॅम्पियनशिपमध्ये दुर्पताने प्राथमिक फेरीत धुळ्याच्या बॉक्सरचा पराभव केला, त्यानंतर तिने पिंपरी चिंचवड, अकोला येथील बॉक्सरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली, जिथे तिने पहिल्या फेरीत मुंबईच्या बॉक्सरचा पराभव केला. राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तिची निवड झाली आहे.
तसेच, सब ज्युनियर मुलांच्या गटात शांतिनिकेतन हायस्कूलच्या अब्दुल शेखने 70+ वजन गटात रौप्यपदक जिंकले. अब्दुलने पहिल्या फेरीत पिंपरी चिंचवडच्या बॉक्सरला त्याच्या प्रीक्वार्टर फायनलमध्ये पराभूत केले आणि नंतर उपांत्य फेरीत सांगली जिल्ह्यातील बॉक्सरचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत अब्दुल साताऱ्याच्या बॉक्सरकडून पराभूत झाला आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या सर्व बॉक्सरना त्यांचे प्रशिक्षक अद्वैत शेंबवणेकर तसेच पुण्यातील माजी ऑलिम्पियन बॉक्सर आणि अर्जुन पुरस्कार विजेते मनोज पिंगळे यांनी प्रशिक्षण दिले आहे.