| खांदेश्वर | प्रतिनिधी |
गणेशोत्सवाला आजपासून सुरुवात होत असल्याने गणेशोत्सवाच्या पुर्वसंध्येला गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी पनवेलच्या भाजी मार्केटमध्ये रविवारी (13) मोठी गर्दी झाली होती. यावेळी भरपावसातही नागरिक छत्र्या घेऊन बाजारपेठेत खरेदीसाठी दाखल झाले होते. बाजारात गणपतीच्या पूजेसाठी आवश्यक असलेली विविध प्रकारची पत्री, पाने, फुले, फळे आणि पूजेचे साहित्य विक्रीसाठी आले होते. त्यात दुर्वा, बेलपत्र, आघाडा, केवडा, तुळस, शमी यांसह विविध प्रकारची पत्री विक्रीसाठी उपलब्ध होती. तसेच नारळ, केळी, मोसंबी, लिंबू यांसह विविध फळांचीही खरेदी केली जात होती. यावेळी गणरायाच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांना आणि हारांना विशेष मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.







